वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण
वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

sakal_logo
By

नाविद शेख : सकाळ वृत्तसेवा
मनोर, ता. ३० : पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले दुर्गम भागाकडे वळत आहेत. पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण आणि जायशेत-बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भाग असलेल्या ठाकूर पाड्याच्या ओहोळावरील धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
वांद्री धरणाचा सांडवा, फेसाळणारा ठाकूर पाडा धबधबा, धरण परिसर आणि जायशेत रस्त्यावरील हिरवाई पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी वांद्री धरण, जंगलाच्या रस्त्यावरील झरे आणि ठाकूरपाड्यातील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
पालघर तालुक्याच्या पूर्व भागात मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीत नैसर्गिक विविधतेने नटलेल्या परिसरात वांद्री धरण आहे. गांजे गावाच्या पूर्वेला वांद्री नदीवर धरण आणि धरणाचा सांडवा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या दक्षिण बाजूकडून दुर्गम भाग असलेल्या जायशेत-बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हिरवाईने नटलेला निसर्ग आणि डोंगरातील नाल्यांवर वाहणारे पांढरे शुभ्र झरे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत वांद्री धरणाचा सांडवा आणि ठाकूरपाड्याचा धबधबा ओसंडून वाहत असतो. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला डोंगर, फेसाळणारे झरे, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि जंगलात उगवणारा रान मेवा, वांद्री धरणातील कोळंबी, कटला आणि रावससारखे मासे तर ओहोळात मिळणाऱ्या चिंबोऱ्या(खेकडे) खवय्यांसाठी मेजवानी ठरत आहेत.


काय पाहाल ?
वांद्री धरण, धरणाचा सांडवा (ओव्हर फ्लो), जायशेत बहिरीफोंडा रस्त्यावरील निसर्गसौंदर्य, डोंगरउतारावरून धरणाच्या दिशेने वाहणारे पाण्याचे झरे, ठाकूर पाडा धबधबा आणि स्थानिक आदिवासी संस्कृती.

कसे जाल ?
पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वेस्थानकावरून मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाण्यासाठी बसची आणि खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. महामार्गावरील वरई फाट्यावरून रिक्षाने धरणावर जाता येते. ठाणे आणि मुंबई शहरातील पर्यटक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने खनिवडे टोल नाक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर ढेकाळे गावच्या उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर वांद्री धरण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90783 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..