
गोखले हायस्कूलमध्ये सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन
कांदिवली, ता. ३० (बातमीदार) ः बोरिवली येथील गोखले हायस्कूलचे १९७३ मध्ये अकरावी शिकलेले विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनंतर एकत्र भेटले. शालेय जीवनाची अविट गोडी, रम्य आठवणी, मस्ती, शिक्षकांच्या आठवणी आणि अन्य काही खास आठवणी या वेळी सर्वांनी सांगितल्या. ५० वर्षांपूर्वी दोन वेण्या, स्कर्ट ब्लॉऊज घालणाऱ्या मुली, हाफ पॅन्ट व शर्ट घालणारी मुले आज वानप्रस्थाश्रमी वाटले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शाळेत असतानाचा, तरुणपणीचा उत्साह दिसत होता. यामुळे हे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
प्रदीप देशपांडे आणि नंदू रानडे यांनी कार्यक्रमाची सूत्रे हातात घेऊन सुरुवात केली. त्यांचे निवेदन उत्तम होते. वर्तुळाकार बसून प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. रिटा गडकरीने केलेल्या बॅचेसमुळे एकमेकांना ओळखणे सोपे झाले. गोखले शाळेच्या या ग्रुपमध्ये सिनेमा कलाकार, उद्योगपती, गायक, डॉक्टर, इंजिनियर, बँकर, शिक्षक आणि समाजसेवी आहेत.
प्रदीप कबरे व अरुण नलावडे या कलाकारांनी आपले अभिनय क्षेत्रातील अनुभव कथन केले आणि दोघेही जुन्या मित्र-मैत्रिणींशी आपलेपणाने बोलले. विद्या वर्तक, विदुला गोगटे आणि सुनील अलसी यांनी गाणी गायली. विजय भिरंगी, सुबोध कोटकर, प्रभा परांजपे आणि नीलिमा टिपणीस यांनी समाजकार्यातील अनुभव सांगितले. मृणाल राजे, वैजयंती गोगटे आणि गिरीश धामणकर यांना इच्छा असूनही येता आले नाही, याचे सर्वांना वाईट वाटले. गोखले शाळेच्या सर्व जणांनी आतुरतेने पुढच्या भेटीची वाट पाहात एकमेकांचा निरोप घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90789 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..