
वाहन, मोबाइल चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगारांना अटक
नालासोपारा, ता. ३० (बातमीदार) : वसई, विरार, नालासोपारासह अन्य परिसरात वाहन, मोबाईल आणि जबरी चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना सीसीटीव्हीच्या आधारे पाळत ठेवून पकडण्यात मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यांनी पेल्हार, नवघर, आचोळा, नालासोपारा, वालीव, तुळिंज या पोलिस ठाण्यातील ८ गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राजेश कुमार जैस्वाल (२१), अभिषेक अरविंदकुमार यादव (२७), सचिन राकेश सिंग (२६) असे आरोपींची नावे असून ते विरार नालासोपारा येथील रहिवासी आहेत. आयुक्तालय क्षेत्रात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल राख, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, सहायक फोजदार चंद्रकांत पोशिरकर, पोलिस हवालदार गोविंद केंद्रे, राजाराम काळे, शिवाजी पाटील, पोलिस अंमलदार महेश वेले, सुशील पवार, संग्राम गायकवाड, सतीश जगताप यांचे स्वतंत्र पथक तयार केले होते.
या पथकाने वसई पूर्व गावराईपाडा परिसरात दोन दिवस सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवून २५ जुलै रोजी राजेश या आरोपीला ताब्यात घेतले, त्याच्या ताब्यातून एक होंडा कंपनीची दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त केले. तसेच त्याच्या चौकशीत त्याने एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच चार वाहन चोरी आणि दोन मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली; तर विरार पूर्व मनवेलपाडा परिसरात सापळा रचून २९ जुलै रोजी अभिषेक आणि सचिन या दोन आरोपींना अटक केली. या दोघांनी दोन गुन्ह्याची कबुली दिली. या तिन्ही आरोपींनी ८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90845 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..