
वसईचे तुंगारेश्वर महादेव मंदिर
वसईचे तुंगारेश्वर महादेव मंदिर
वसई, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील सातिवली येथील तुंगारेश्वर पर्वतावर पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी धार्मिक स्थळ, धबधबे आणि अभयारण्य असा त्रिवेणी संगम पाहावयास मिळतो. हे मंदिर २,१७७ फुटावर आहे. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वत नेत असताना काही भाग तुंगार पर्वतावर पडला. हाच मंदाग्नी म्हणजे तुंगार पर्वत अशी आख्यायिका आहे. श्रावणात येथे भाविकांची अलोट गर्दी असते. तुंगारेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.
डोंगरावरचा हा प्रवास भाविक पायी करतात; तर काही जण वाहनांचा आधार घेत महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. ठाणे, पालघर, डहाणू, मुंबई आदी परिसरातून भक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोरोनामुळे या मंदिरात गेली दोन वर्षे भाविकांना प्रवेश नव्हता; मात्र या वर्षी थेट दर्शन घेता येणार असल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे. दर सोमवारी सकाळी ५ वाजता महाआरती; तर रविवारी भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात येते. तसेच शंकराच्या नामाचा जयघोष पूर्ण श्रावण महिनाभर सुरू राहणार आहे.
डोंगराळ भागात असल्याने येथे हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे. येथील निसर्गसौंदर्य टिकून राहावे, तसेच पर्यावरणाला हानी निर्माण होऊ नये म्हणून तुंगारेश्वर मंदिर ट्रस्टने परिसरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. दरवर्षी मंदिराकडून वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला जातो. आंबा, जांभूळ, कडूलिंब यासह विविध औषधी, फळांची व विविध जातीच्या रोपांची लागवड केली जाते व त्याचे संगोपनदेखील करण्यात येते. त्यामुळे हा परिसर अधिकाधिक बहरत आहे. श्रावण महिन्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप तुंगारेश्वर मंदिराकडून करण्यात येणार आहे, तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले असल्याची माहिती तुंगारेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे पुरुषोत्तम पाटील यांनी दिली. तसेच देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक एकोपा जपला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90897 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..