गुळगुळीत रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळगुळीत रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण
गुळगुळीत रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण

गुळगुळीत रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे बळी जात असताना आता नवीन तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले गुळगुळीत रस्तेही अपघातांना आमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या अपघातांमध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नसली, तरी हे गुळगुळीत रस्ते दुचाकीस्वारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच घटना नौपाडा येथे घडली असून, या अपघातातून रोशन म्हात्रे हा तरुण थोडक्यात बचावला. त्यानंतर आता या अपघातग्रस्त तरुणांनी समाजमाध्यमावरच जनजागृती मोहीम राबवत या रस्त्यांवरून सावकाश वाहन चालवा, असे आवाहन केले आहे.

पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील नौपाडा, मखमली आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलावर खड्डेमुक्त होण्यासाठी ते गुळगुळीत केले. हे रस्ते पाहून कळवा पुलावरील रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी केल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले; पण पावसाळा सुरू होत नाही तोच या गुळगुळीत रस्त्यांची ‘घसरगुंडी’ झाल्याचे दिसत आहे. जून महिन्यात नौपाडा उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्याच्या काही घटना पहिल्यांदाच समोर आल्या. याबाबत नौपाडा पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रार केली होती. मात्र, नेमक्या किती दुचाकी घसरल्या याबाबतची कोणतीही नोंद नाही.

पालिकेने मारल्या खाचा
अपघातांच्‍या मालिका सुरू झाल्या आणि मखमली उड्डाणपुलावर दुचाकी घसरू लागल्याची तक्रार वाहतूक पोलिसांनीच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे केली. या वाढत्या घटना लक्षात घेऊन महापालिका अधिकाऱ्यांनी हे प्रकार रोखण्यासाठी त्या उड्डाण पुलावरील रस्त्यावरती जेसीबीच्या सहाय्याने खाचा मारल्या. त्यामुळे हे प्रकार कमी होतील असे वाटले होते. पण, काही दिवसांनी मखमली उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्याचा पूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचीही तक्रार आपत्ती कक्षाकडे एका माजी नगरसेवकाने केली. हे होत नाही तोच नौपाड्यातील उड्डाणपुलावर घसरलेल्या दुचाकीवरून चालक जखमी झाल्याने पुन्हा हे रस्ते चर्चेत आले आहेत.

हे रस्ते खरोखरच खूप चांगले आहेत. या रस्त्यांवर अजून तरी एकही खड्डा पडलेला नाही; पण या गुळगुळीत रस्त्याने जर दुचाकी किंवा इतर वाहने घसरत असतील, हे रस्ते तसे घातकच आहे. हे सांगायला नको. या रस्त्यांवर जसे खड्डे पडणार नाहीत, त्याचप्रमाणे वाहने घसरून कोणाचा जीव जाणार नाही, याची दक्षता वेळीच महापालिका प्रशासनाने घ्यावी.
- राजेश चव्हाण, दुचाकीस्वार
गुळगुळीत रस्ते शहरभर तयार करण्यापूर्वी ते महापालिका भवनाजवळ करून अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा. तसेच ज्यांनी हे नवे तंत्रज्ञान आणले त्यांनी त्या रस्त्यावर चाळीसच्या वेगाने वाहन चालवत ब्रेक दाबावा.
- रोशन म्हात्रे, जखमी दुचाकीस्वार
----------------------------------------
येथे वाहने हळू चालवा
दिवसेंदिवस गुळगुळीत रस्त्यावरून घसरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने दुचाकीस्वारांनी सावकाश जावे, असे आवाहन केले जात आहे.
........

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90900 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top