
भाताच्या सानुग्रह अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
वाडा, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय जव्हारअंतर्गत येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सर्व ३३ भात खरेदी केंद्रांवर आधारभूत खरेदी योजनेत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातासाठी प्रतिक्विंटल ७०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना आजतागायत शासनाकडून मिळालेले नाही. या सानुग्रह अनुदानाची रक्कम २७ कोटी १२ लाख ५० हजार सातशे रुपये इतकी आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम शासनाने तातडीने देऊन सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील ११,७४६ शेतकऱ्यांकडून आदिवासी विकास महामंडळाकडून २०२१-२२ मध्ये ३,८७,५०१ क्विंटल भाताची खरेदी झाली. या भाताची एकूण किंमत ७५,१७,५३,४३३ रुपये इतकी असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाली; मात्र राज्य शासनाकडून जाहीर केलेली प्रतिक्विंटल ७०० रुपये इतके सानुग्रह अनुदान (बोनस) रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेले नाही.
रोगराई, अतिवृष्टी व परतीचा पाऊस या नैसर्गिक संकटांशी सामना करीत पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात पिकवलेल्या भाताची खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून केली गेली. गेल्या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये सानुग्रह अनुदान राज्य शासनाकडून देण्यात आले; मात्र या वर्षी अजूनपर्यंत या सानुग्रह अनुदानाबाबत शासनाकडून नव्याने कुठलाच खुलासा केलेला नाही.
...
प्रतिक्रिया
भातशेतीसाठी प्रतिक्विंटल १८०० ते १९०० रुपये उत्पादन खर्च येतो; तर बोनसचे पैसे हा शेतकऱ्यांचा नफा असतो, पण बोनस न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने बोनस न दिल्यास जिल्हाभर आंदोलने करू.
प्रफुल्ल पाटील, अध्यक्ष, काँग्रेस, पालघर जिल्हा
शेतकऱ्यांना भाताचा बोनस मिळावा म्हणून आम्ही कुणबी सेनेच्या माध्यमातून पालघर व वाडा येथे आंदोलने केली. यानंतर भिवंडी, शहापूर व विक्रमगड येथे आंदोलने करणार असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनचार दिवसांत भेट घेऊन बोनसच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत.
डॉ. विवेक पाटील, सरचिटणीस, कुणबी सेना
राज्य शासनाने सहा हजार कोटीची तरतूद केली आहे; मात्र अद्यापही बोनस जाहीर केलेला नाही.
राजेश पवार, उप प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, मोखाडा, वाडा
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90913 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..