
गतिमंद मुलांनी बनवल्या आकर्षक राख्या
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : पेण रामवाडी येथील गतिमंद मुलांसाठी असणारी आई डी केअर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनसाठी हजारों राख्या बनवल्या आहेत. या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवल्या असून, त्याची विक्री देश-विदेशातही केली जात आहे. विशेष विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांना नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे संस्थेच्या कार्याध्यक्षा स्वाती मोहीते यांनी आवाहन केले आहे.
पेणमध्ये शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था ही आई डी केअर आहे. या संस्थेच्या माध्यमातून शाळेतील २२ विद्यार्थ्यांनी या वर्षी १५ प्रकारच्या साडेचार हजार राख्या बनवल्या आहेत. सध्या रक्षाबंधन सण जवळ आल्याने हे विद्यार्थी राख्या बनवण्यात मग्न आहेत. या राख्या नवी मुंबई, पनवेल येथे विक्री स्टॉल्सवर लावण्यात आल्या आहेत. यासाठी अनेक समाजसेवी संस्थांनी मदत केली असून, जन शिक्षण विभाग रायगड आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांनी जवळपास एक हजार ५०० राख्या खरेदी केल्या आहेत. यंदाचा रक्षाबंधन सण जवळ आल्याने हे विद्यार्थी राख्या बनविण्यात मग्न आहेत. यासह काही हितचिंतकांनी या विशेष मुलांच्या मेहनतीतून साकारलेल्या राख्या खरेदी केल्या आहेत. या राख्या नागरिकांनी खरेदी करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्षा स्वाती मोहिते यांनी केले आहे.
या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून विद्यार्थ्यांना मानधन दिले जात आहे. त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपला हातभार असणे गरजेचे आहे. या मुलांनी मणी राखी, बिजबंधन राखी, फुल फळांच्या झाडांच्या बिया वापरून तयार केलेल्या राख्या या आकर्षित ठरत आहेत. यासाठी आई डे केअर संस्थेच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील, उपाध्यक्ष डॉ. शिल्पा ठाकूर, ॲड. सतीश म्हात्रे, संतोष चव्हाण, विद्या खराडे, शिल्पा पाटील, ज्योती मॅडम, वंदना पवार, मनोज मेस्त्री, छाया तळेकर आदींनी मेहनत घेतली आहे.
देश-विदेशासह सीमेवरील जवानांना राख्या
वडखळ (बातमीदार) : दिव्यांग मुलांनी रक्षाबंधन सणानिमित्त हजारो आकर्षक राख्या बनवल्या आहेत. यामध्ये मण्यांच्या राख्या, कॉटन दोरा राख्या, कागदी-फिलिंग राख्या, लोकर, गोंडा राख्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांकडून वर्षभरात आठ ते दहा हजार राख्या बनवल्या जातात. या राख्यांना विदेशातही मागणी असते.
फुलझाडांच्या बियांपासून बिजबध राख्या तयार केलेल्या पाहायला मिळत आहेत. या राख्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, बंगळूर, कर्नाटक, चंद्रपूर, चंदीगड आदी राज्यांसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा विदेशातही पाठवल्या जातात. तसेच सीमेवरील भारतीय सैनिकांनाही यावर्षी ५०० राख्या पाठवल्या आहेत. याच बरोबर विद्यार्थी कापडी पिशवी, बुके, कापडाची फुले, टूब्लेक्स पेपरची फुले, आकाश कंदील, साबण, दिवे, पणत्या, शोभेच्या वस्तू आदी प्रकारचे साहित्य बनवतात.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90921 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..