
पुणे - गोरखपूर एक्स्प्रेस होणार २२ डब्याची
आता पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस होणार २२ डब्यांची
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनंतर पुणे - गोरखपूर एक्स्प्रेसला प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे - गोरखपूर एक्स्प्रेस २१ डब्यांऐवजी २२ डब्यांची होणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे पुणे - गोरखपूर एक्स्प्रेसमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक १५०३० पुणे-गोरखपूर एक्स्प्रेसला पुणे येथून ८ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून प्रथम श्रेणी वातानुकूलित एक डबा जोडणार आहे; तर रेल्वे क्रमांक १५०२९ गोरखपूर - पुणे एक्स्प्रेस गोरखपूर येथून ६ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून प्रथम श्रेणी वातानुकूलित एक डबा जोडणार आहे. आता सुधारित संरचनेनुसार, पुणे - गोरखपूर एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असे २२ डबे असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे - गोरखपूर एक्स्प्रेसला प्रथम श्रेणी डबा जोडणीची मागणी केली होती. प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वेने पुणे - गोरखपूर एक्स्प्रेसला प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90938 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..