
बीएसयुपी घरांची लवकरच होणार दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : कचोरे येथील बीएसयूपी प्रकल्पातील घरे बांधून झाली असून अद्याप लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. कचोरे बीएसयूपी प्रकल्पातील ३७१ सदनिकांचे यापूर्वी वाटप झाले असून ७११ सदनिका रिकाम्या आहेत. उंबर्डे फेज १ येथे सुरू असलेल्या ६०० सदनिकांची कामे पूर्ण होत आली आहेत. या सदनिका वितरित करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. बाबासाहेब दांगडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे बीएसयूपी प्रकल्पातील घरांची लवकरच दुरुस्ती होऊन लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. दांगडे यांनी शनिवारी पालिकेच्या सुरू असलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, परिमंडळ एकचे उपायुक्त धैर्यशील जाधव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोरोना कालावधीत सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात दरवाजे, खिडक्या, विद्युत साहित्याची चोरी झाली आहे. या सदनिका दुरुस्त कराव्या लागतील. उंबर्डे येथील सदनिकांचे काम पूर्ण होत आले असून तीन महिन्यांच्या कालावधीत त्या हस्तांतरित करता येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली.
आयुक्तांचा पाहणी दौरा
----
या वेळी आयुक्तांनी काळा तलाव सुशोभीकरणाचे काम, स्टेशन रोड सॅटिस प्रकल्प, सिटी पार्क प्रकल्प, प्रस्तावित नेव्हल गॅलरी परिसर कामाची पाहणी केली. जरीमरी नाल्यावरील स्लॅबचे काम, एफओबीचे काम, स्मार्ट रस्ता प्रकल्प, रिंग रोडची कामे आदी विकास कामांची पाहणी आयुक्तांनी केली. प्रकल्पाच्या पाहणीच्या वेळी आयुक्त डॉ. दांगडे यांनी पर्यावरणाशी बांधिलकी जपत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले, स्थानिक नागरिकांची प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पाहणीदरम्यान आढळलेली अतिक्रमणे त्वरित निष्कासित करण्याचे सक्त निर्देश संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90950 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..