ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी म्हणून ''दिघे'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी म्हणून ''दिघे''
ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी म्हणून ''दिघे''

ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी म्हणून ''दिघे''

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे : ता. ३१ : आजही आनंद दिघे यांच्या नावाने ठाण्यातील राजकारणाचा श्री गणेशा करण्यात येत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता ठाण्यात शिंदे गटाला रोखण्यासाठी शिवसेनेने ‘दिघे’ नावाचे कार्ड बाहेर काढले आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या आनंद दिघे यांच्या नावातील दिघे हे नाव अनेक वर्षांनी पुन्हा जिल्हाप्रमुखपदी विराजमान झाल्याने शिवसेनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिंदे गट तयार केला. त्यानंतर आमदार, खासदारांपाठोपाठ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला जाहीररीत्या पाठिंबा दर्शवल्याने शिवसेना रिकामी करण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे शिंदे गटाला उघड उघड समर्थन करणाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली गेली. त्यातच पहिली हकालपट्टी ठाणे जिल्ह्यातूनच झाली. त्यानंतर ठाणे जिल्हाप्रमुख कोण असाच प्रश्न उपस्थित होत होता. तसेच त्या पदावर मातोश्रीवरून नियुक्ती जाहीर केली जात नव्हती. त्यातच खासदार राजन विचारे आणि केदार दिघे यांचे नाव पुढे आले होते. रविवारी अखेर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शिवसेना उपनेतेपदी आणि ठाणे जिल्हाप्रमुख पदासह अनेक पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. उपनेतेपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला शिवसैनिक तथा महिला आघाडीच्या आक्रमक पदाधिकारी तसेच आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेल्या अनिता बिर्जे यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे देण्यात आली आहे. ठाणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी प्रदीप शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली असून ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर चिंतामणी कारखानीस यांची नेमणूक केली आहे.

शिवसेनेचं ठाण्यात दिघे कार्ड
----
एकीकडे दिघे यांच्या नावाने राजकारण सुरू असताना, शिवसेनेने त्याच दिघे यांचे वारस असलेल्या केदार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्याचबरोबर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिकांना पदे वाटप करून शिवसेनेला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी शिलेदारांची फौज उभी केली आहे; तर आता ‘दिघे’ यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना केदार दिघे कसे रोखणार हेच पाहावे लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90964 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top