
झाडांची माहिती सिडकोकडे उपलब्ध नाही
पर्यावरण संवर्धनाला सिडकोची तिलांजली
पाच हजार झाडांच्या पुनर्रोपणाबाबत अनभिज्ञ, पर्यावरणप्रेमी नाराज
खारघर, ता.१ (बातमीदार) : गोल्फ कोर्सचा विस्तार करताना डोंगरालगत असलेल्या जमिनीवरील आठशे झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगितले जात आहे. मात्र, नवी मुंबई मेट्रो आणि नवी मुंबई विमानतळ उभारताना अडथळा ठरणाऱ्या, पुनर्रोपण झालेल्या पाच हजारांहून अधिक झाडे जिवंत आहेत, याची माहिती सिडकोच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
नवी मुंबई मेट्रो उभारताना बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गात अडथळा ठरणाऱ्या १३६० आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, वाघिवली, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे, वडघर, वहाळ, कुंडे वहाळ गावात आणि परिसरातील जमिनीवर जवळपास साडेतीन हजारांहून अधिक झाडांचे खारघरमधील सेंट्रल पार्क आणि तळोजा मध्यवर्ती कारागृह शेजारील डोंगराच्या पायथ्याशी पुनर्रोपण करण्यात आले होते. त्यानुसार काही झाडांचे पुनर्रोपणही करण्यात आले, मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने बहुतांश झाडे सुकून गेल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. याविषयी सिडकोच्या उद्यान अधिकारी गीता सावंत यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून माहिती मिळेल, असे सांगितले; तर जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी माहिती मिळाली नसल्याचा खुलासा केला आहे.
गोल्फ कोर्ससाठी ८७३ झाडांची तोड
खारघरमधील गोल्फ कोर्सच्या विस्तारात अडथळा ठरणाऱ्या डोंगरालगत असलेल्या जमिनीवरील ८७३ झाडांची तोड करण्यात येणार आहे. काही तक्रारी असल्यास सिडकोच्या उद्यान विभागात संपर्क साधावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले होते. वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.
निवृत्त अधिकाऱ्याचा दुजोरा
सिडकोच्या खारघर कार्यालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, ओवे टेकडीच्या पायथाशी आणि सेंट्रल पार्क दोनमधील जागेत काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, मात्र पुनर्रोपण करताना झाड बुंध्यापासून अलगद उखडून आणून खोल खड्डा खोदून पुनर्रोपण करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे वाचू शकली नाहीत.
कोट -
नवी मुंबई विमानतळ परिसरातून काही झाडांचे पुनर्रोपण सिडकोने तळोजा कारागृहाशेजारील डोंगराच्या पायथ्याशी केले होते. या झाडांच्या संवर्धनासाठी एजन्सीची नेमणूक केली होती, पण पुनर्रोपण केलेल्या झाडांपैकी काही झाडे वणव्यामध्ये जळून गेली आहेत. ही बाब स्थानिक सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र काहीही उपाययोजना झालेली नाही.
-धर्मेंद्र कर, पर्यावरणप्रेमी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90980 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..