
मुलींनी उच्च शिक्षण घेऊन सबल बनावे
कासा, ता. १ (बातमीदार) : समाजात स्त्रियांना अनेकदा दुहेरी विचारसरणीची वागणूक मिळते. यात एक वर्ग स्त्रियांची पूजा करतो, त्यांना देवस्थानी मानतो; तर दुसरा वर्ग त्यांच्यावर अत्याचार, अन्याय करतो. त्यामुळे मुलींनी उच्च शिक्षण घेऊन सबल बनावे, असे ॲड. संयुक्ता तामोरे यांनी सांगितले. त्या ‘महिला सुरक्षा व विधीविषयक जाणिवा’ यावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होत्या.
तलासरीतील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयत आयोजित या कार्यक्रमात ॲड. संयुक्त तामोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार, ग्रंथपाल डॉ. एम. होन आदी उपस्थित होते.
या वेळी ॲड. तामोरे यांनी महिला विषय विविध कायदे, त्या कायद्यांचा होणारा उपयोग तसेच गैरवापर याचा विविध अनुभव व उदाहरणांसहित जाणीव करून दिली. तसेच अल्पसंख्याक स्त्रियांवर होणारे अत्याचार, अन्याय थांबवण्यासाठी मुलींनी उच्च शिक्षण घेऊन सबल बनण्याची गरज आहे, हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजपूत यांनी केले. प्रस्ताविकामध्ये प्राचार्यांनी महाविद्यालयात जी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा फायदा घेऊन स्वतःचे भविष्य घडविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता गावित यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रा. प्रियंका चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील २५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91029 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..