बंदीनंतरही पीओपी मूर्ती बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदीनंतरही पीओपी मूर्ती बाजारात
बंदीनंतरही पीओपी मूर्ती बाजारात

बंदीनंतरही पीओपी मूर्ती बाजारात

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्ती वापरावर बंदी घातल्यानंतर केडीएमसी प्रशासनानेदेखील तडकाफडकी ही बंदी पालिका हद्दीत लागू केली. गणेश मूर्ती निर्मिती व विक्री परस्पर होऊ नये म्हणून पालिकेची परवानगी मूर्तिकार, विक्रीकारांना बंधनकारक केली; मात्र ही बंदी धुडकावत श्रींच्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या असून, अनेक पीओपी मूर्तींचे बुकिंगदेखील झाले असल्याचे दिसून येत आहे. पालिकेची परवानगी न घेता विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता; मात्र पालिकेने याविषयी आम्हाला काहीच लेखी सूचना दिलेली नसल्याचे सांगत बाजारात पीओपीच्या मूर्ती विक्रीस आल्या आहेत. प्रदूषणमुक्तीचा कित्ता गिरवण्यासाठी कोणताही सारासार विचार न करता पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय यामुळे आता त्यांच्याच अंगलट येणार असल्याचे दिसत आहे.

पीओपीच्या मूर्ती वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतही या मूर्ती वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या मूर्तीची निर्मिती व विक्री परस्पर होऊ नये, त्यावर पालिकेचा अंकुश राहावा यासाठी या वर्षी प्रथमच परवाना प्रत मूर्तिकार विक्रेत्यांना बंधनकारक केली आहे. पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून गणेशमूर्ती निर्मिती व विक्रीसाठी परवानगी घ्यायची. त्‍यानंतर ही मंजूर प्रत उत्पादन कारखाना व दुकानाच्या दर्शनी भागात लावून ठेवावी, अशा सूचना पालिका प्रशासनाने २० दिवसांपूर्वी मूर्तिकारांना केल्या होत्या. परवानगी न घेता मूर्तींची विक्री केल्यास त्यांच्यावर पालिका प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील दिला होता.

गणेशोत्सव महिनाभरावर आला असून मंडळ व घरगुती अशा अनेक मूर्तींचे बुकिंग झाले आहे; तर काही बुकिंग अद्याप सुरू आहे. बाजारात पीओपीच्या मूर्तीदेखील सामील असून, त्यांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मूर्ती निर्मिती व विक्रीच्या ठिकाणी पालिकेची कोणतीही मंजूर प्रत लावण्यात आलेली नाही. पीओपी मूर्ती विक्री करू नये यासाठी आम्हाला पालिकेकडून कोणतीही लेखी सूचना आलेली नाही, परवानगी प्रतविषयी आम्हाला काही माहिती नाही. पालिकेने किमान वर्षभर आधी ही सूचना आम्हाला देणे गरजेचे होते. आता मूर्ती बनवून तयार असून त्यांचे बुकिंगदेखील झालेले आहे. आतापर्यंत कोणीही पालिकेचे अधिकारी आमच्याकडे आलेले नाहीत. जर पीओपीच्या मूर्तींवर बंदीच घालायची आहे, तर किमान आता तरी पालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन तशा सूचना कराव्यात. जेणेकरून मूर्तिकार विक्रेते पुढील वर्षी पीओपीच्या मूर्ती बनवणारच नाहीत असे मूर्तीकार, विक्रेते सांगतात.
केडीएमसीचा केवळ दिखावा
प्रदूषणमुक्तीसाठी तडकाफडकी निर्णय घेणारे केडीएमसी प्रशासन आता आपली बाजू कशी सावरते हे पाहावे लागेल. पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे; तर तशा सूचना प्रत्येक मूर्तिकारापर्यंत का पोहोचल्या नाहीत, बाजारात पीओपीच्या मूर्ती दाखल झाल्यानंतर प्रशासनाला त्याची जाणीव नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रदूषणमुक्तीसाठी आम्ही काम करत असल्याचा केवळ दिखावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पालिका प्रशासनाने याविषयीची सूचना प्रत्येक स्टॉलवर जाऊन देणे गरजेचे होते, परंतु तशी कोणतीही सूचना आम्हाला आलेली नाही. तसेच आमच्या पीओपीच्या मूर्ती बनून तयार झाल्यानंतर पालिकेने ही घोषणा केली. पीओपी मूर्तीपासून जर प्रदूषण होत असेल तर पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच या मूर्ती स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांची योग्‍य विल्हेवाट लावावी. या सर्व गोष्टींचा विचार करून नंतरच कारवाईचा धाक दाखवावा. त्यांच्याकडून सूचना आल्यानंतर पुढील वर्षी त्याची आम्ही अंमलबजावणी करू.
विनोद कुकडे, मूर्तिकार, विक्रेते

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91034 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..