
ठाणे पालिकेची विक्रमी कर वसुली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम ठाणे महापलिकेच्या तिजोरीवर झाला होता. अशातच ठाणे महापालिकेने कोलमडलेली अर्थव्यवस्था उभारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यातच पालिकेने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले. त्यात मागील वर्षी ३१ मार्च २०२१ रोजी एका दिवसात १८ कोटींची वसुली करण्यात झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी एका दिवसात तब्बल १५ कोटींची मालमत्ता कर वसुली झाली आहे. आतापर्यंत पालिकेने ३४४ कोटींची वसुली केली असून गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली २९ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पालिकेने सुट्टीच्या दिवशीही कार्यालये खुली ठेवत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना कर भरणे कसे सोयीचे होईल यासाठी प्रतिसाद देणारी टीम तयार करण्यात आली असल्याने मालमत्ता कर भरणे नागरिकांना अधिक सोपे गेले. परिणामी गतवर्षीपेक्षा या वर्षी २९ टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता कर वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ७७० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी हेच उद्दिष्ट ५९१ कोटी एवढे ठेवण्यात आले होते. या आर्थिक वर्षात आतापर्यंत ३४४ कोटींची वसुली झाली आहे; तर गतवर्षी या कालावधीत हीच वसुली २६६ कोटींची होती. यामध्ये चार टक्के कर सवलतीचा फायदाही नागरिकांकडून घेण्यात आला आहे; मात्र असे असले, तरी पालिकेने सुरू केलेल्या मदत कक्षामुळे वसुलीला अधिक बळ मिळाले आहे.
दरम्यान, मालमत्ता कर भरणाऱ्यांनी ऑनलाईन कर भरण्यालादेखील चांगला प्रतिसाद दिला असून यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत १०६ कोटी रुपये जमा झाले आहेत; तर उर्वरित २३८ कोटी हे ऑफलाईन पद्धतीने जमा झाले आहेत. वसुलीचा हा वेग अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
.....
चौकट :-
प्रभाग समितीनिहाय वसुली
प्रभाग समिती वसुली (कोटींमध्ये)
उथळसर २४.६४
नौपाडा-कोपरी ४७.८३
कळवा ११.४४
मुंब्रा ११.८९
दिवा १०.२०
वागळे १०.७०
लोकमान्य-सावरकर १२.०५
वर्तक नगर ५६.७७
माजिवडा -मानपाडा १३०.५५
मुख्यालय २७.२१
....
एकूण ३४३.२७
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91127 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..