रानमेव्याच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रानमेव्याच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार
रानमेव्याच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार

रानमेव्याच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार

sakal_logo
By

नाविद शेख : मनोर
उद्योगधंद्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध नसल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडल्याने अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असलेल्या ग्रामीण भागातील आदिवासींना रानमेव्याच्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग सापडला आहे. भातशेतीच्या कामातून वेळ काढत कुटुंबाचा रहाटगाडा हाकण्यासाठी पावसाळ्यात जंगलात उगवणारी शेवळी, करडू, कोळी भाजी, बांबूची शिंद, माठ, दिंडे आणि खापरा यांसारख्या रानभाज्या वेचून आणल्यानंतर शनिवार आणि रविवारच्या दिवशी पालघर तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर महामार्गालगत बसून रानभाज्यांची विक्री केली जात आहे. शाळेला असलेल्या सुट्टीच्या दिवशी कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्यासाठी लहानगेही रानमेव्याच्या विक्रीसाठी पालकांना मदत करताना दिसून येत आहेत.
पावसाळ्यात हाताला काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत. रानमेव्यांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आदिवासी कुटुंबे रानभाज्यांच्या विक्रीकडे वळत आहेत. मान्सूनला सुरुवात होताच जंगलात रानभाज्या उगवण्यास सुरुवात होते. रानभाज्यांबाबत उत्तम ज्ञान आणि कष्ट करण्याची तयारी असलेल्या ग्रामीण भागातील आदिवासी बांधव जंगल पालथे घालून रानभाज्या शोधून आणतात; तर रानभाज्यांसोबत घरात पाळलेले गावरान कोंबडे आणि ओहोळात मिळणाऱ्या चिंबोऱ्या (खेकडे) विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत.
वरई पारगाव रस्त्यावरील गुंदावे गावच्या हद्दीत असलेल्या वळणाजवळच्या रस्त्यालगत रानभाज्यांच्या विक्रीसाठी आदिवासी महिला बसतात, भाजी खरेदी करणारे ग्राहक त्यांची वाहने रस्त्यावर पार्क करून उतरत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे वन विभागाच्या जागेत आदिवासींना रानभाज्यांच्या विक्रीसाठी स्टॉल बांधून देण्याची मागणी पुढे येत आहे.

उत्पन्नाचे उत्तम साधन
आदिवासीबहुल ग्रामीण भागात रस्त्यालगत, लगतची बाजारपेठ आणि महामार्गालगत रानभाज्या मुबलक प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. आरोग्यवर्धक आणि चवीला रुचकर असलेल्या रानभाज्यांना पर्यटन आणि शहरी ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला रानभाज्या विक्रीतून आदिवासींना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

शहरी ग्राहकांकडून विशेष पसंती
जंगलात उगवणाऱ्या शेवळी, कोळी भाजी, खापरा माठ, बांबूची शिंद, टाकळा, करडू यांसारख्या रानभाज्या रस्त्यालगत आणि बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. रस्त्यालगत विक्रीला बसलेल्या महिलांच्या रानभाज्यांना शहरी ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. वरई-पारगाव रस्त्यावर गुंदावे गावच्या हद्दीत आठवड्याचे शेवटचे दोन दिवस रानभाज्यांच्या विक्रीला जोर चढतो. वरई-पारगाव रस्त्यावरून केळवे समुद्र किनाऱ्याकडे जाणारे पर्यटक, सफाळे आणि पालघरच्या दिशेने जाणारे शासकीय अधिकारी, कारचालक आणि गृहिणी रस्त्यालगत बसलेल्या आदिवासी महिलांकडून रानभाज्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येतात.

दिवसभरात तीनशे रुपयांची कमाई
खत आणि कीटकनाशकांचा अंश नसलेल्या नैसर्गिक रानभाज्या आदिवासी जंगलातून शोधून आणल्यानंतर त्यांच्या जुड्या बांधल्या जातात. शनिवार आणि रविवारच्या दिवशी रस्त्यालगत विक्रीला ठेवल्या जातात. दिवसभराच्या विक्रीतून साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपये मिळत असल्याची माहिती विक्रेत्या महिलेने दिली.

रानभाज्यांचे विक्रीचे दर
कोळीभाजी १५ जुडी
करडू १५ जुडी
शेवळी २५ जुडी
दिंडे १५ जुडी
खापरा १५ जुडी
शिन २० वाटा
करवंद १० वाटा
टाकळा १० जुडी


----
कुटुंबातील पुरुष मंडळी जंगलात जाऊन रानभाज्या वेचून आल्यानंतर रस्त्यालगत बसून विक्री करते. रान भाज्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून कुटुंबाला हातभार लागतो. शनिवार आणि रविवारी केळवे समुद्र किनाऱ्यावर जाणारे पर्यटक रानभाज्यांची खरेदी करतात.
- सरिता पवन भोईर, भाजी विक्रेती, गुंदावे (शाळेचा पाडा)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91151 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top