
ऑनलाईन शिकाऊ वाहन परवान्याचा गैरकायदेशिर वापर
शिकाऊ वाहन परवान्यासाठी
आॅनलाईन सेवेचा गैरवापर
वाशी आरटीओ अधिकाऱ्याची कारवाई
मुंबई, ता. २ : शिकावू वाहन परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आणि चाचणी देण्याची गरज नसल्याचा दावा सायबर कॅफे चालकांकडून केला जात आहे. परिवहनच्या ऑनलाईन धोरणाचा गैरफायदा घेऊन ‘फोटो व आधार कार्ड द्या आणि लर्निंग लायसन्स मिळवा’ अशा जाहिरातीही केल्या जात आहे. वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक अधिकारी गजानन गावंडे यांनी अशा प्रकारे बेकायदा दावा करून लायसन्स देणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
परिवहनच्या ऑनलाईन धोरणाचा कुठेही गैरवापर होऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिंग स्कूल अशा संस्थांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. शिवाय तात्काळ लर्निंग लायसन्स मिळवा, अशा जाहिराती करून अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाकडे आल्या आहेत. वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरातच बेकायदा जाहिराती करून लर्निंग लायसन्स दिले जात असल्याचे आढळून आल्यावर कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार कदम यांनी बनावट अर्जदार बनून कुलदीप सिंग याच्या कॅफेमध्ये छापा मारून मोठ्या शिताफीने त्याला रंगेहाथ पकडले. १५०० रुपये घेऊन तो शिकावू परवाना देत असल्याचे आढळून आले आहे. गजानन गावंडे यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात संबंधित प्रकरणी तक्रार केली असून, सिंग याच्यावर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन लर्निंग लायसन्ससह परिवहन विभागाच्या सेवांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे गावंडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91165 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..