
‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी एसटी महामंडळ सज्ज
मुंबई, ता. २ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे आयोजन केले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळही सज्ज झाले आहे. महामंडळाचे सुमारे ९० हजार अधिकारी-कर्मचारी आपल्या घरावर तिरंगा फडकवणार आहेत. त्यासंदर्भात राज्यातील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. त्याची सांगता १५ ऑगस्ट रोजी होईल. जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला आपला तिरंगा प्रत्येकाच्या घरावर फडकवण्याचा बहुमान अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मिळाला आहे. त्यात एसटीचा प्रत्येक कर्मचारी हिरिरीने सहभागी होणार आहे. राज्यभरातील एसटी बसवर सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्याबरोबरच महामंडळाच्या सर्व आगार-बसस्थानकांवरील ध्वनिक्षेपकावरून जिंगल आणि ध्वजगीत वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे.
स्वच्छता सप्ताह
१३ ते १५ ऑगस्टदरम्यान सर्व प्रमुख बसस्थानकांवर विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. रांगोळी काढून सर्व बसस्थानके सजवण्यात येत आहेत. उत्सवाचे निमित्त साधून ९ ते १६ ऑगस्टदरम्यान एसटीमध्ये स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत सामूहिक प्रयत्नातून बसस्थानक, स्वच्छतागहे आणि बसची स्वच्छता करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91170 Txt Raigad Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..