घरडा सर्कलमधील वाहतूक बेटाचा अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरडा सर्कलमधील वाहतूक बेटाचा अडथळा
घरडा सर्कलमधील वाहतूक बेटाचा अडथळा

घरडा सर्कलमधील वाहतूक बेटाचा अडथळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कलमधील वाहतूक बेटाचा आकार मोठा असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहन कोंडीची समस्या उद्‍भवत आहे. या बेटाचा आकार कमी करण्यात यावा, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. वाहतूक विभागानेदेखील यापूर्वी पालिका प्रशासनास याविषयी पत्रव्यवहार केला आहे; मात्र त्याकडे पालिका प्रशासन गांभिर्याने पाहत नसल्याने घरडा सर्कल या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथील सिग्नल यंत्रणा ही बंद ठेवली जाते, परंतु सिग्नल नव्‍हे तर बेटाचा आकार वाहतूक कोंडीत भर घालत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल हा तीन दिशा मार्गिकेचा आहे. कल्याण, मुंबई दिशेकडून शहरात येण्यासाठी वाहने अनेकदा याच मार्गाचा वापर करतात. मानपाडा रस्त्याची अवस्था खराब असल्याने वाहनचालक घरडा सर्कलमार्गे डोंबिवली शहरात जाणे पसंत करतात. येथील वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी काही वर्षांपूर्वी येथे वाहतूक बेट उभारण्यात आले आहे. कालांतराने शहराचा विकास, नागरिकीकरण आणि वाढत्‍या वाहनांची संख्या यामुळे वाहनकोंडीची समस्या उद्‍भवू लागली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ही कोंडी सोडवण्यासाठी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सिग्नल यंत्रणा चौकाचौकात उभारण्यात आल्या आहेत, परंतु खराब रस्ते, वाहतुकीचे फसलेले नियोजन यामुळे येथील सिग्नल यंत्रणा कधी सुरू, तर कधी बंद अशा अवस्थेत असते. सिग्नल यंत्रणेऐवजी येथील वाहतूक बेटाचा आकार कमी केला तर वाहन कोंडीची मोठी समस्या सुटेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. वाहतूक विभागानेदेखील याविषयी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे; मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
----
वाहतूक कोंडीची समस्या तीव्र
वाहनांना येथून ये-जा करताना या बेटाला वळसा घालून जावे लागत आहे. त्यातच क्रीडासंकुलाच्या दिशेने रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक बस उभ्या असतात. आजदे गावाच्या वेशीजवळ बस व रिक्षांचा थांबा आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडते. कोंडी झाल्यास कल्याणहून घरडा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांची रांग बंदीश हॉटेलपर्यंत जाते. टिळक पुतळ्याहून येणाऱ्या वाहनांची रांग अनेकदा शिवम रुग्णालयाच्यादेखील पुढे जाते. डोंबिवली जिमखाना रोडवरून येणाऱ्या वाहनांनाही यामुळे अडथळा निर्माण होतो. या वाहतूक बेटाला वळसा घालावा लागू नये म्हणून काही वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करीत असल्याने त्याने कोंडीची समस्या तीव्र होते.

सिग्नलची वेळ ही जास्त असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. हा सर्कलदेखील मोठा असून, त्याला वळसा घेऊन वाहन चालवणे त्रासदायक आहे.
कांचन क्षीरसागर, प्रवासी

वाहतूक बेटाचा आकार मोठा असल्याने गोलाकार वळसा घेण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागते. सर्कलचा आकार कमी केल्यास अनेक समस्या सुटतील.
प्रणव गोखले, प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91177 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top