ऑनलाईन गुन्हेगारीला लागणार चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन गुन्हेगारीला लागणार चाप
ऑनलाईन गुन्हेगारीला लागणार चाप

ऑनलाईन गुन्हेगारीला लागणार चाप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : ऑनलाईन व्यवहार वाढत असतानाच फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेकांना याविरोधात तक्रार कुठे करायचे हे देखील माहिती नसते. वेळ गेल्‍यानंतर पोलिसही काही करू शकत नाही. यावर मात करण्यासाठी गृह विभागाने ‘सायबर क्राईम पोर्टल’ची निर्मिती केली असून सुरुवातीच्या तासात पोर्टलवर तक्रार केल्यास ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालता येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रायगड पोलिसांकडे मागील महिन्यातच ही सुविधा उपलब्ध झाली असून त्‍यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पोर्टलमुळे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांनाही सोपे झाले आहे. अनेकवेळा ओटीपीनंबर दिल्यानंतर, एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन फसवणूक होते. काहीवेळा दिशाभूल करून फसवणूक केली जाते. अशा गुन्ह्यांची तत्‍काळ नोंद व्हावी, या उद्देशाने सरकारने एक पोर्टल तयार केले आहे.
पोर्टलसाठी सर्व बॅंकांच्या नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याने कोणत्याही बॅंकेतील पैसे काही तासांतच परत मिळवता येतात. पोर्टलवर तातडीने माहिती भरल्यास फसवणूक झालेले पैसे ‘ब्लॉक’ करून ते पुन्हा मूळ बॅंक खात्यावर जमा करण्याची तरतूद केली आहे.
सायबर गुन्हेगारी हे पोलिसांसमोरच नव्हे तर सर्व नागरिक, ग्राहकांसमोरही आव्हान आहे. फसवणूक झाली तर पैसे परत मिळतीलच, याची खात्री नसते. ग्रामीण भागातील नागरिकही या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. अनेकवेळा तक्रार करण्यात उशीर होतो, त्या दरम्यान ऑनलाईन व्यवहार पूर्ण होत असल्याने पोलिसांनाही काही करता येत नाही.
रायगड पोलिसांच्या सायबर सेलकडे सहा महिन्यांत ३० गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभने दाखवत काही क्षणात बॅंक अकाऊंटचा बॅलेन्स ‘झिरो’ करतात. त्यामुळे नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान आणि मनस्‍ताप सहन करावा लागतो. सायबर गुन्हेगार दुसऱ्या राज्यात बसून हे गुन्हे करीत असल्‍याने त्‍यांच्यापर्यंत पोलिसांना त्वरित पोहोचता येत नाही. यामुळे कमी वेळेत साध्यासोप्या पद्धतीने तक्रार करण्याची पद्धत गृह विभागाने सुरु केली आहे.

पोर्टलवर तक्रारीची सोपी पद्धत
पोर्टलवर तक्रार फसवणूक झाल्यानंतर त्वरित करावी. त्या ठिकाणी तारीख, वेळ आणि ट्रान्झक्शन आयडी द्यावे. किंवा ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. त्याचा नंबर देणे गरजेचे आहे. तक्रार नोंद झाल्यास त्या क्षणाला तुमचे पैसे ज्या ठिकाणी (ज्या बॅंकेत) आहेत. त्याच ठिकाणी ते ब्लॉक केले जातील. यासाठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरुवातीचे तास महत्त्वाचे आहेत.


पोर्टल तुम्हाला माहिती देईल
पोर्टलवर तक्रार केल्यानंतर तक्रारीचे पुढे काय होते? तपास कुठेपर्यंत आला आहे. तक्रारीचा स्टेटस काय आहे, याची माहिती कोणत्याही क्षणाला तुमच्या मोबाइलवर पोर्टलद्वारे मिळते. त्यामुळे तपासाची माहिती कोणालाही विचारण्यासाठी जावे लागत नाही किंवा पोलिस ठाण्यातही यावे लागत नाही.

‘सायबर क्राईम’ वाढल्यामुळे तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी शासनाने पोर्टल तयार केले आहे. यात सर्व बॅंकाचे नोडल अधिकारी आहेत. फसवणुकीचे पैसे कोणत्याही बॅंकेत असतील तर ते परत करण्याची व्यवस्था होते. त्यासाठी फसवणुकीनंतर कमीत कमी वेळेत पोर्टलवर तक्रार करणे आवश्‍यक आहे.
- राजन जगताप, पोलिस निरीक्षण, सायबर सेल

सायबर सेलचा पोर्टल आय डी
http://cybercrime.gov.in/

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91241 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..