नगरसेविका, कथालेखिका ते चित्रपट निर्माती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेविका, कथालेखिका ते चित्रपट निर्माती...
नगरसेविका, कथालेखिका ते चित्रपट निर्माती...

नगरसेविका, कथालेखिका ते चित्रपट निर्माती...

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २ ः महापालिका निवडणुकीसाठी आता मुंबईतील प्रभागांची रचना बदलली आहे. काही आरक्षित झाले आहेत; तर काही खुले. नव्या परिस्थितीत आपण नेमके कुठून लढायचे, पक्षश्रेष्ठी उमेदवारी देतील का, शिवसेना संपवण्याच्या लढ्यात भाजप कोणकोणत्या लोकप्रिय नगरसेवकांना पुन्हा रिंगणात उतरवणार इत्यादी प्रश्नांवर चर्चा झडत असतानाच ज्योती पराग अळवणी यांनी मात्र राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घोषित केला आहे. नगरसेविका म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या ज्योतीताई आता वेबनिर्मात्या झाल्या आहेत. गूढकथांचा समावेश असलेल्या वेब फिल्मची निर्मिती त्यांनी केली आहे. नगरसेविका, कथालेखिका ते चित्रपट निर्माती असा त्यांचा प्रवास सुरू आहे.

भाजप नेते पराग अळवणी यांना नगरसेवक असताना राखीव जागांमुळे प्रभाग मिळाला नाही, तेव्हा विनोद तावडे आणि आशीष शेलार या मित्रांशी सल्लामसलत करून त्यांनी लढायचे नाही, असा निर्णय घेतला. शिवसेनेकडे प्रभाग गेला. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत विलेपार्ले प्रभाग महिलांसाठी राखीव झाला. भाजपने निर्णय घेतला, कुठल्याही नेत्याच्या पत्नीला उमेदवारी मिळणार नाही. काही अपवाद झालेही; पण पार्लेकरांच्या आग्रहामुळे पराग अळवणींच्या पत्नी ज्योती रिंगणात उतरल्या अन् अपक्ष म्हणून निवडून आल्या. पुढेही त्या लढण्यास राजी नव्हत्या; पण भाजपला शिवसेनेशी टक्कर द्यायची असल्याने पक्षादेशामुळे त्यांना रिंगणात उतरावे लागले. त्या मोठ्या मताधिक्याने निवडूनही आल्या. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार प्रश्न, शिक्षणाची स्थिती, बालिका आहार आदी प्रश्न त्यांनी मांडले. स्थायी समितीवर कामही केले; पण आता निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच त्यांनी ‘मला लढायचे नाही’ असे जाहीर करून मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

ज्योती अळवणी नर्तिका होत्या. मागे पडलेली नृत्यसाधना सुरू करण्याचे घोषित करतानाच त्यांनी वेबचित्रनिर्मितीचा शोदेखील नुकताच आयोजित केला होता. त्या गूढकथा लिहितात. त्यातील चार छोट्या भयकथांचा कोलाज असलेला चित्रपट त्यांनी तयार केला आहे. राईट ब्रेन प्रॉडक्शनतर्फे तयार झालेल्या त्यांच्या ‘एपिलॉग’ चित्रपटाचे प्रदर्शन यू-ट्युबवर उपलब्ध आहे. फॅशन डिझायनर राहुल अगस्ती त्याचे सहनिर्माते आहेत.

घरीच चित्रीकरण
तरुण दिग्दर्शक कृणाल रेगे याने आपल्या चमूसह ज्योती अळवणी यांच्या गूढकथा साकारल्या आहेत. भुताच्या गोष्टींचे चित्रीकरण अगदी कमी पैशांत पराग आणि ज्योती अळवणी यांच्या घरीच झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91247 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..