
ग्रंथालये उभारण्यासाठी तरुणांनी चळवळ आवश्यक
पालघर, ता. ३ (बातमीदार) : मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणाई वाचनापासून दूर जात आहे. तरुणाईसाठी वाचन आवश्यक असून तरुणांनी गावागावांमध्ये ग्रंथालय उभारणीसाठी चळवळ निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य महेश देशमुख यांनी केले. पालघर येथे एकलव्य गौरव पुरस्काराच्या वितरणावेळी ते बोलत होते.
राष्ट्रसेवा दल, पालघर तालुक्यातर्फे दरवर्षी प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या एकलव्यांचा गौरव त्यांच्या पालकासह केला जातो. या वर्षी ६० एकलव्यांचा व त्यांच्या पालकांचा पालघर येथील काँग्रेस भवन सभागृहात सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य महेश देशमुख, कौशल्य विकास तज्ज्ञ प्रवीण पवार, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर, सुधाकर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. देश सुधारायचा असेल, तर प्रत्येक गावात ग्रंथालय हवे. जोपर्यंत गावोगावी ग्रंथालय होणार नाही, तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. पुस्तकांमधून ज्ञान व माहिती मिळते. गावोगावी गणेश मंडळे उभारण्यासाठी तरुण वर्ग पुढाकार घेतो, तसाच पुढाकार आपल्या प्रत्येक गावात वाचनालय उभारण्यासाठी घेतला पाहिजे, असा विचार प्राध्यापक महेश देशमुख यांनी मांडला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91324 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..