
शिवसेना शाखेवर हक्क सांगू नये
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : एखादी शाखा माझ्या बापाची मालमत्ता आहे म्हणून त्याच्यावर कोणी हक्क सांगू नये. ती शिवसेनेची आहे आणि ती कायम राहणार, असे विधान शिंदे समर्थक कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी डोंबिवली येथे केले. शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत शिंदे समर्थक व ठाकरे समर्थकांत मंगळवारी दुपारी राडेबाजी झाली. यावेळी ठाकरे समर्थकांनी शाखा आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे, असे खोचक विधान केले होते. यावर लांडगे यांनी ठाकरे समर्थकांना हा टोला लगावला.
डोंबिवलीत शिवसेनेतील शिंदे व ठाकरे समर्थक यांच्यातील राजकीय वाद चिघळत चालला आहे. मंगळवारी दुपारी शिंदे समर्थकांनी शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. यावेळी शिंदे व ठाकरे समर्थकांमध्ये राडेबाजी झाली. त्यानंतर सायंकाळी शिंदे समर्थक गटाच्या वतीने सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. भगवे झेंडे व बॅनर शहरभर लावण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाकडून पाच हजार फॉर्मचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सदस्य नोंदणीचा शुभारंभ डोंबिवलीत करण्यात आल्याची माहिती यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख लांडगे यांनी दिली. एकूण ३० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून, ते पुढील तीन दिवसांत आम्ही पूर्ण करू. कल्याण-डोंबिवलीमधून नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91338 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..