
आरेतील रुग्णालयाची दुरवस्था
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) ः आरे वसाहतीमधील युनिट क्र. १६ येथे कृषी व पदुम विभागाच्या अखत्यारीतील आरे रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. हे रुग्णालय पालिका प्रशासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक आदिवासी, शासकीय कर्मचारी यांना रुग्णालयात कोणतीही सुविधा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या रुग्णालयात १४ खोल्या आहेत. अधिक आजारी रुग्णास जोगेश्वरी येथील ट्रॉमा, गोरेगाव पश्चिम येथील पालिकेचे रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतो. आरे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास गोरेगाव पूर्व परिसरातील हजारो गोरगरीब रुग्णांना आणि आरेतील आदिवासी पाड्यांतील बांधवांना तसेच जवळच्या मरोळ पोलिस कॅम्पमधील पोलिसांनाही याचा लाभ होणार आहे. या रुग्णालयातील वेतन हे शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग देते. औषध व जागा ही दुग्धविकास विभागाची आहे. मग हे आरेतील रुग्णालय सर्व सुविधेसह शासनाच्याच आरोग्य विभागास का दिले जात नाही, अशी विचारणा येथील नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
हस्तांतर रखडले
आरे मध्यवर्ती दुग्धशाळेतील कर्मचारी व परवानाधारक यांच्यासाठी राज्य शासनाने १९६९ मध्ये येथे रुग्णालय सुरू केले होते; परंतु कालांतराने अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे या रुग्णालयाची दुरवस्था होऊन सध्या या ठिकाणी केवळ बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरे रुग्णालय दुग्धविकास विभागाने २०१६ मध्ये परिपत्रक काढून हे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली होती. मात्र दुग्धविकास विभाग व महापालिका यांच्या वादात ते रखडले आहे. दुग्धविकास विभागाकडून सदर रुग्णालय पालिकेने ताब्यात घ्यावे, यासाठी सरकारी रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
२०२१ मध्येही सुरू होत्या हालचाली
दरम्यान मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आरे रुग्णालय आयुष मंत्रालयामार्फत कार्यान्वित करण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी तत्कालिन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तसेच केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून हे रुग्णालय सुरू करण्यासाठी राज्य शासनातर्फे तत्काळ प्रस्ताव सादर करावी अशी मागणी २०२१ मध्ये करण्यात आली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91348 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..