
पुरुष नसबंदीच्या प्रमाणात सहा महिन्यांत वाढ
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : कोविड काळानंतर मुंबईत पुरुष नसबंदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हे प्रमाण महिलांच्या तुलनेत कमी असले, तरी आकडेवारीनुसार पुरुषांमध्येही नसबंदीविषयी जागरूकता वाढत असल्याची दिलासादायी बाब समोर आली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोविड काळात पुरुष नसबंदीचे प्रमाण हे फारच कमी नोंदले गेले होते. २०२० मध्ये संपूर्ण वर्षात ४९ पुरुषांनी नसबंदी करून घेतली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ६१ पुरुषांनी नसबंदी करून घेतली. २०२२ मध्ये हे प्रमाण दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत जून पर्यंत १११ पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. या आकडेवारीनुसार, यंदा नसबंदीबाबत पुरुषांमध्ये जनजागृती वाढली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पुरुष नसबंदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
एप्रिलअखेरीस ‘सकाळ’ने नसबंदीमध्ये पुरुषांचे प्रमाण कमी असल्याची नोंद केली होती. यावर मुंबई महापालिकेने पुरुषांना कायमस्वरूपी नसबंदीबद्दल समुपदेशन करणार असल्याचे सांगितले होते.
...
आणखी वाढ होईल!
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, पुरुष नसबंदी करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. शिवाय पालिका समुपदेशनाद्वारे नसबंदीचे महत्त्व समजावून सांगत असल्याने संख्येत आणखी वाढ होईल. पुरुषांनी नसबंदी करून घेतल्यास आम्ही दीड हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देतो, ज्यामुळे संख्या वाढली आहे. पुरुषांमधील नसबंदीबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी आम्ही अधिक जागरूकता निर्माण करणार आहोत.
...
महिलांची संख्या मोठी
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार २०१७ ते २०२२ या सहा वर्षांत फक्त एक हजार ४३६ पुरुषांनी नसबंदी केली आहे. त्याच तुलनेत जवळपास ५५ हजारांपेक्षा जास्त महिलांची नसबंदी पूर्ण झाली. म्हणजेच महिलांच्या तुलनेत फक्त दोन टक्के पुरुषांनी नसबंदीसाठी पुढाकार घेतला आहे
...
जनजागृती मोहिमेला प्रतिसाद
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त संपूर्ण मुंबईतील वॉर्डांमध्ये जनजागृती पंधरवडा मोहीम राबवली गेली होती. ११ जुलैपासून १५ दिवस राबवलेल्या या मोहिमेत जवळपास ३० पुरुषांनी, २०५ स्त्रियांनी नसबंदी केली. तसेच प्रसूतीनंतर २७१ कॉपर टी आणि ११५ महिलांना अंतराचे इंजेक्शन दिले गेले. या पंधरा दिवसांत राबवलेल्या मोहिमेमुळे कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला जनसमुदायातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी डॉ. वैशाली चंदनशिवे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91388 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..