डोंबिवली शिवसेना शाखेचे विभाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवली शिवसेना शाखेचे विभाजन
डोंबिवली शिवसेना शाखेचे विभाजन

डोंबिवली शिवसेना शाखेचे विभाजन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळवण्यासाठी मंगळवारी (ता. २) शिंदे व ठाकरेसमर्थक आपसात भिडले. शिंदेसमर्थकांनी जोरदार विरोध करीत शिवसेना शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. या राडेबाजीनंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शिंदे व ठाकरे गटात विभाजन झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाखेमध्ये चार खोल्या असून मधील दोन खोल्या शिंदे गटाने ताब्यात घेतल्या आहेत. या खोल्या लॉक करीत त्यांनी येथे ठाकरे समर्थकांना येण्यास मज्जाव केला आहे. शिंदे गटाने दमदाटी केली, तरी ठाकरे समर्थकांनी मात्र सध्या शांततेची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही पोलिसदेखील येथे तैनात आहेत.

शिवसेना पक्ष आमचाच, यावरून सध्या शिंदेसमर्थक व ठाकरेसमर्थक गटात वाद सुरू आहे. शाखांवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटांकडून जास्तीत जास्त सभासद नोंदणी व्हावी, यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी (ता.२) सायंकाळी शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन करीत सभासद नोंदणीला सुरुवात केली. त्याआधी दुपारी मोठ्या जमावासह शिंदेसमर्थकांनी शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. शाखेत शिंदे पिता-पुत्राचे फोटो लावण्यात त्यांना यश आले. याआधीही डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील शाखेचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटात राडेबाजी झाली होती. या वेळी ठाकरेसमर्थक डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांना शाखेत चोरी केल्याप्रकरणी अटकदेखील करण्यात आली होती.

मंगळवारच्या या राडेबाजीनंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे दोन गटांत विभाजन झाल्याचे दिसून येत आहे. शाखेमध्ये चार खोल्या असून यातील मध्यभागी असलेल्या दोन खोल्यांवर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असून त्या बाजूला बैठक खोली आहे. या दोन्ही कार्यालयांवर शिंदे गटाने ताबा मिळविला आहे; तर सुरुवातीची व शेवटची अशा दोन खोल्या या ठाकरे समर्थकांच्या ताब्यात आहेत. दोन ते तीन समर्थक केवळ शाखांत बसलेले असून पोलिसांचादेखील खडा पहारा शाखेच्या बाहेर आहे. जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत शांततेची भूमिका सध्या दोन्ही गटांनी घेतल्याचे चित्र शाखेत दिसून येत आहे.
---
दुसऱ्या फळीची ठाकरेंना साथ
कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असले, तरी कट्टर शिवसैनिक मात्र आजही ठाकरे गटात आहेत. शिंदे गटात दिग्गजांची फळी सामील झाली असली, तरी त्यांना ठाकरे गटातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आव्हान देत असल्याने शिंदे गट काहीसा चिंतेत आहे. यातूनच डोंबिवलीतील राजकीय वातावरण पेटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91406 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..