साथीचे आजार बळावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साथीचे आजार बळावले
साथीचे आजार बळावले

साथीचे आजार बळावले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना आता साथीच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात डेंगी, हिवताप चिकनगुनियासारखे आजार बळावले असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. साथीच्या आजाराचे रुग्ण एकीकडे वाढत असताना अचानक गायब झालेला पाऊस, कधीतरी डोकावणाऱ्या तुरळक सरी, दिवसा कडक ऊन, रात्रीचा उकाडा अशा विचित्र हवामानाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. ताप, सर्दी, खोकल्‍याने ठाणेकर बेजार झाले असून, खासगी रुग्णालये हाऊसफुल होताना दिसत आहे.

श्रावण महिना म्हणजे उनपावसाचा खेळ असे म्हटले जाते. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने हवामान पूर्णत: बदलले असून ते विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. यामध्ये सर्वाधिक धोका डेंगीचा असल्याचे समोर आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ८४ जणांना डेंगीचा डंख लागला आहे. त्यात पावसाने उघडीप घेतल्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डास वाढून हा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे डेंगी वाढू नये यासाठी नागरिकांनी कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
साधारणपणे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, डेंगी असे १६ प्रकार जलजन्य आणि कीटकजन्य या साथीच्या आजारांमध्ये नमूद केले आहे. तसा दर महिन्याचा अहवाल सादर केला जातो. सध्या कोरोना या आजाराच्या संसर्गाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता हळूहळू साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे हाती लागलेल्या शासकीय माहितीनुसार, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत जवळपास ७१ हजार ९४ नागरिकांनी ओपीडीत येऊन आरोग्य तपासणी केली आहे. त्यामध्ये ७८९ जणांना साथीचे आजार झाले आहेत.


ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ओपीडीत आलेल्या ३० हजार ९२० जणांपैकी १२ जणांना हिवताप, ७ जणांना चिकनगुनिया, तर ६६ जणांना डेंगीची लागण झाल्याचे समोर आले आहे.

-अंबरनाथ नगर परिषद रुग्णालयाच्या ओपीडीत २४ हजार ५८४ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली असून, त्यामध्ये १६२ जणांना विषमज्वर, ३९२ जणांना अतिसार, १२ जणांना डेंगी, ३ जणांना हिवतापाची बाधा झाली होती.

-बदलापूर नगर परिषदेच्या रुग्णालयात तपासणीसाठी १५ हजार ५९० जणांपैकी १०३ जणांना अतिसार, ६ जणांना डेंगी, तर ६ जणांना हिवतापाची बाधा झाली होती.

-एकीकडे साथीचे आजार वाढत असताना मात्र यामध्ये कोणीही दगावले नसल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. साथीच्या १६ आजारांच्या प्रकाराकडे पाहिल्यास डेंगी, कावीळ, विषमज्वर आणि अतिसार याचे रुग्ण अधिक असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे.

रुग्णालये हाऊसफुल
साथीचे आजार वाढत असताना विषाणूजन्य आजाराचेही रुग्ण वाढले असल्याचे दिसत आहे. हवामान बदलामुळे डोकेदुखी, ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये वृद्ध व लहान मुलांना अधिक लागण होत असल्याचेही समोर आले आहे. केवळ शासकीय, पालिका रुग्णालयेच नव्हे तर खासगी रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
---------------------------------------
पावसाळ्याच्या काळात जलजन्य आजाराबरोबरच साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे व उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे, पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. तसेच डेंगी वाढू नये यासाठी नागरिकांनी कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91449 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top