
ऐरोली येथील भुयारी मार्गचा तिढा सुटणार
ऐरोली भुयारी मार्गाचा तिढा सुटणार
पालिकेकडून नवीन नकाशे रेल्वेला सादर; नऊ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित
वाशी, ता.४ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर रोड व ऐरोली नाका परिसराला जोडणाऱ्या ऐरोली नाका परिसरातील भुयारी मार्गाचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. पालिकेने या मार्गाचे नवीन नकाशे रेल्वेकडे सादर केले असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नव्याने प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला ऐरोली नाका येथील भुयारी मार्गाचा प्रलंबित प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
महापालिकेने चार वेळा ऐरोली नाका येथील भुयारी मार्गाची निविदा काढली होती. मात्र रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले होते. पालिकेने या भुयारी मार्गासाठी २३ सप्टेंबर २०१३ रोजी अनामत रक्कम म्हणून ३७ लाख ३२ हजार ५०० रुपये देखील भरले आहेत. मात्र उच्च दाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे उड्डाण पूल बांधता येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. आता पालिकेकडून रेल्वेला नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हे काम मार्गी लागणार असल्याने ऐरोली नाका, ऐरोली गाव, शिवकॉलनी, महावितरण वसाहतीमधील नागरिकांना ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठीच्या द्राविडी प्राणायामातून सुटका होणार आहे.
वाहतूक कोंडीवर तोडगा
ऐरोली नाका येथे भुयारी मार्ग झाल्यास ठाणे-बेलापूर रस्त्यावरून ऐरोली नाका येथे जाणे सोपे होणार आहे. हा भुयारी मार्ग झाल्यास भारत बिजली व ऐरोली रेल्वेस्थानक येथील भुयारी मार्गावरचा ताण कमी होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
असा बांधणार भुयारी मार्ग
ऐरोली नाका येथील वखारीपासून ठाणे-बेलापूर मार्गावरील चिंचपाडा येथे रेल्वे ट्रॅकच्या खालून २०० मीटरचा हा भुयारा मार्ग बांधण्यात येणार आहे. तसेच या मार्गातून पादचाऱ्यांसह वाहनेदेखील जाणार आहेत.
भुयारी मार्गाच्या खर्चात वाढ
२०१३ मध्ये ऐरोली नाका येथील भुयारी मार्गाचा प्रस्ताव बनवण्यात आला होता. त्यावेळी भुयारी मार्गाचा खर्च हा ३४ कोटी रुपयांपर्यंत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ झाली असून भुयारी मार्गासाठी ४१ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
------------------------------------------
ऐरोली नाक्यावरील भुयारी मार्गासाठी रेल्वेकडे नव्याने नकाशे सादर करण्यात आले आहेत. रेल्वेच्या मंजुरीनंतर हे काम मार्गी लागणार आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91473 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..