देशातील ज्वलंत प्रश्नी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील ज्वलंत प्रश्नी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
देशातील ज्वलंत प्रश्नी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

देशातील ज्वलंत प्रश्नी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ (बातमीदार) ः केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहत आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत, असा अरोप करीत शुक्रवारी (ता. ५) राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेल भरो करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले; मात्र केवळ सात लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. लष्करात भरती होऊन देशाची सेवा करू पाहणाऱ्या तरुणांना फक्त चार वर्षांची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गाचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
...
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या!
अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे, असेही ते म्हणाले.
...
नाना पटोले यांचे नेतृत्व
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शुक्रवारी सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल. त्यानंतर जेल भरो केले जाणार आहे. राज्यात सर्व स्थानिक नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91520 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..