...कथित खंडणीप्रकरणी निलंबित केलेले पोलिस उपायुक्त पराग मनेरे पुन्हा सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parag Manere
उपायुक्त पराग मनेरे पुन्हा सेवेत

...कथित खंडणीप्रकरणी निलंबित केलेले पोलिस उपायुक्त पराग मनेरे पुन्हा सेवेत

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित खंडणीप्रकरणी निलंबित केलेले पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांना राज्य सरकारने पुन्हा सेवेत घेतले आहे.
राज्याचे अप्पर मुख्य सचिव, गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मणेरे यांच्या निलंबनाचा आढावा घेतला होता. या समितीने मणेरे यांना शासन सेवेत पुन्हा घेण्याची शिफारस केली. या संदर्भातील शासकीय आदेश बुधवारी (ता. ३) गृहविभागाने जारी केला. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी परमबीर सिंह यांच्यासोबत मणेरे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परमबीर सिंह यांचे विश्वासू अधिकारी म्हणून मानले जाणारे पराग मणेरे हे राजकीय साठमारीत भरडले गेल्याचे म्हटले जाते.


२०२१ मध्ये पहिली तक्रार परमबीर सिंग आणि इतर १६ पोलिस अधिकाऱ्‍यांवर अकोला पोलिसांनी नोंदवली होती. आरोपींच्या यादीत मणेरे आणि संजय शिंदे यांचा समावेश होता. दुसरा गुन्हा २४ जुलै २०२१ रोजी कोपरी पोलिसात नोंदवण्यात आला. यात परमवीर सिंह यांच्यासह मणेरे आणि तीन जणांची सहआरोपी म्हणून नाव आले. त्यानंतर तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंह, मणेरे यांच्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यावरून तत्कालीन राज्य सरकारने परमबीर सिंग आणि पराग मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

अंतर्गत राजकारणात भरडले?
पराग मणेरे २००५ मध्ये पोलिस सेवेत पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. उत्कृष्ट सेवेसाठी विशेष सेवा पदकासह अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत. त्यांनी तीन वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात नक्षलवादी भागात काम केले. भिंवडी, मुंब्रा यांसारख्या संवेदनशील भागात त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणून काम केले. २०१७ मध्ये त्यांची मुंबई पोलिस दलात आर्थिक गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. मणेरे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांत तपास पूर्ण होऊनही आरोपपत्र दाखल झालेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91593 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top