
पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून ८ नवीन एसी लोकल फेऱ्या
पश्चिम रेल्वेच्या ८ नवीन एसी लोकल फेऱ्या
सोमवारपासून सेवेत दाखल होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : प्रवाशांमध्ये एसी लोकल ट्रेनची वाढती लोकप्रियता आणि मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने सोमवारपासून (ता. ८) आठ नवीन अतिरिक्त एसी लोकल फऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४० वरून ४८ पर्यंत जाणार आहे.
एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर, पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल गाड्यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ८ ऑगस्टपासून मुंबई उपनगरीय विभागात ८ अतिरिक्त एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने यापूर्वी २० जून २०२२ रोजी ८ एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली होती. आता पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल नुकतीच दाखल झाली आहे. यामुळे आणखी एसी लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.
पश्चिम रेल्वेच्या या ८ नवीन अतिरिक्त एसी लोकल सेवांपैकी ४ डाऊन दिशेने आणि ४ अप दिशेने धावणार आहेत. अपच्या दिशेने विरार-चर्चगेट, बोरिवली-चर्चगेट, मालाड-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे. त्याचप्रमाणे डाऊन दिशेने चर्चगेट-विरार, चर्चगेट-बोरिवली, चर्चगेट-मालाड आणि चर्चगेट-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे.
असे असणार वेळापत्रक
अप मार्गवरील
- विरार-चर्चगेट जलद लोकल सकाळी ७.३० वाजता
- बोरिवली-चर्चगेट जलद लोकल सकाळी ९.४८ वाजता
- मालाड-चर्चगेट जलद लोकल सायंकाळी ५.५२ वाजता
- भाईंदर-चर्चगेट धीमी लोकल रात्री ७.५२ वाजता
---------------------
डाऊन मार्गवरील
- चर्चगेट-विरार जलद लोकल सकाळी ७.२२ वाजता
- चर्चगेट-बोरिवली जलद लोकल सकाळी ९.४४ वाजता
- चर्चगेट-मालाड जलद लोकल सकाळी ११.४८ वाजता
- चर्चगेट-भाईंदर जलद लोकल रात्री ७. ४२ वाजता
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91634 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..