
कल्याण - शीळ रोडवर महिलांचा रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः कल्याण पूर्वेतील टाटा पावर हाऊस परिसरातील देशमुख होम्स कॉम्प्लेक्समधील नागरिकांना पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. निवेदने, तक्रारी, मोर्चा, आंदोलन करूनदेखील येथील नागरिकांची पाण्याची समस्या सुटलेली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून आश्वासने दिली जातात, मात्र पाणी येत नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
देशमुख होम्समध्ये १९ इमारती असून १३०० सदनिका आहेत. गेल्या ६ वर्षांपासून येथील नागरिक पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. अनेक वेळा नागरिकांनी पालिका प्रशासन, एमआयडीसी अधिकाऱ्यांना याविषयी निवेदने दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. मात्र पाण्याची समस्या सुटलेली नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अखेर शुक्रवारी सायंकाळी शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. महिला हंडा, कळशी घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. केडीएमसी, एमआयडीसी प्रशासनाविरोधात यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी केली. ‘रास्ता रोको’ केल्याने काही काळ या परिसरात वाहन कोंडी झाली होती. अखेर मानपाडा पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना बाजूला करीत वाहतूक सुरळीत सुरू केली. यावेळी पाणी समस्या सुटली नाही तर यापेक्षाही जास्त संख्येने रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला.
बड्या संकुलांना पाणी वळविल्याचा आरोप
----------------------------------
देशमुख होम्सचे पाणी इतर बड्या संकुलांना वळविले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करतात. प्रशासनानेदेखील हे मान्य केले आहे, मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढे काहीही प्रयत्न होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91639 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..