
दृष्टीक्षेप
कफ परेड मच्छीमार नगर येथे २०० राष्ट्रध्वजांचे वाटप
मुंबादेवी (बातमीदार) ः ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होत कफ परेड मच्छीमार नगर येथील २०० नागरिकांना राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई महापालिकेच्या ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. याप्रसंगी पालिकेचे सहायक अभियंता मोहिते, कनिष्ठ अभियंता अरुण वैद्य, पर्यवेक्षक मोहिते, जयंत राऊत, प्रमोद पवार, कमलाकर कांबळे आणि विनोद डोडिया यांनी नागरिकांना १५ ऑगस्ट रोजी घरावर सुरक्षित जागी ध्वज फडकवावा आणि सामूहिक राष्ट्रगान करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
बीकेसी येथे रक्तदान शिबिर
घाटकोपर (बातमीदार) ः शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अदानी इलेक्ट्रीसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस मंगेश दळवी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर, सचिव अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात ७८ हून अधिक जणांनी रक्तदान केले. बांद्रा बीकेसी येथील कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अदानी इलेक्ट्रीसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे सदस्य व शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराला शिवसेना सचिव विनायक राऊत, माजी मंत्री अनिल परब, विभागप्रमुख विलास पोतनीस, व्यवस्थापनाचे मानव संसाधन प्रमुख मनोज शर्मा, संपर्कप्रमुख संदीप भोज आदी उपस्थित होते.
सकिनाबाई चाळीतील रस्त्यावरील चेंबर खचले
धारावी (बातमीदार) : सकिनाबाई चाळीतील अंतर्गत रस्त्यावरील मोठे चेंबर खचले आहे. यामुळे पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वाटेवरून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांना चालणे मुश्कील झाले आहे. हे चेंबर अधिक खचून अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल, असा सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधी पालिकेने लवकरात लवकर हे खचलेले चेंबर दुरुस्त करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
फिटनेससंदर्भात ऑनलाईन वेबिनार
मालाड (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता फिटनेस तंत्र आणि मंत्र या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे. यात डॉ. माधव देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसंदर्भातील अधिक माहितीसाठी किरण वैद्य ९७६९७८८९१७ यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
कैलास उदमले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ समितीवर
वडाळा (बातमीदार) ः मराठी अध्यापनाचे कार्य २५ वर्षे करणारे तसेच विविध माध्यमांतून मराठी भाषेसाठी काम करणारे कैलास उदमले यांची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ समितीवर निवड करण्यात आली आहे. ते २०१५ मध्ये गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेमधून पदव्युत्तर पत्रकारिता पदविका तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मराठी भाषेसाठी, समाजातील विविध प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कैलास उदमले यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91663 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..