
लोकशाही बचावासाठी आजपासून विविध संघटनांचे कार्यक्रम
मुंबादेवी, ता. ६ (बातमीदार) : विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येत ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान लोक स्वातंत्र्य संस्थेच्या नेतृत्वात लोकशाही बचावासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. यावेळी ॲड. निरंजनी शेट्टी, सुबोध मोरे आणि फिरोज मिठीबोरवला उपस्थित होते. या कार्यक्रमांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, लाल निशाण पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकत्रित योगदान देणार आहेत.
७ ते १० ऑगस्ट या काळात दादर येथील रचना कॉलेजच्या शेजारी भूपेश गुप्ता भवन येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत तरुण चित्रकार मंडळींचे पेंटिंग्स, शिल्प, चित्रपट, लघुपट याचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या चित्रदालनाचे उद्घाटन ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होईल. ९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ग्रँड रोड स्टेशनपासून ते ऑगस्ट क्रांती मैदान येथे ‘चले जाव १९४२’ च्या आंदोलनाचा जागर प्रभात फेरी काढून करण्यात येईल. १० ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथे सायंकाळी सहा वाजता बहुभाषिक कविसंमेलन होईल. या कवी संमेलनाचे उद्घाटन डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर पश्चिम येथे जनवादी संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी तीन ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत विविध पुरोगामी पक्ष व संघटनाचे प्रमुख या नेत्यांची भाषणे होणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91669 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..