
अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
अजित शेडगे, माणगाव
जैवविविधतेने नटलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच निसर्गसृष्टीला जणू बहरच येतो. एकीकडे भातलागवड, फळभाज्यांच्या लागवडीची लगबग सुरू असते, तर दुसरीकडे कपारीतून वाहणारे धबधबे, विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगर-माळरानाचा हिरवाकंच परिसर निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर घालतो. सध्या इवल्याशा सुगरणीची खोपा बांधण्यासाठी सुरू असलेली लगबग लक्ष वेधून घेते. विशिष्ट आकार, अतिशय कलात्मक-आकर्षक वीणकाम, रेखीव बांधणी केलेले खोपे सध्या माळरानात विविध झाडांवर नजरेस पडू लागले आहेत.
रायगडमध्ये तयार झालेल्या भातशेतीच्या खाजणाजवळ सुगरण पक्ष्यांनी आपल्या वसाहती उभारल्या असून एका एका झाडावर पाच ते दहा खोपे टाकलेले दिसतात. उत्तम कारागिरीचा नमुना म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुगरण पक्ष्याचे घरटे पक्षी अभ्यासकांचे तसेच पर्यटकांना भुरळ घालतात. विशिष्ट प्रकारचे गवत व भाताच्या पातीपासून तयार केलेली ही घरटी सुगरण नर पक्षी बांधतो. बाभळी व काटेरी झाडांवर ही घरटी मोठ्या प्रमाणात दिसतात.
मे ते सप्टेंबर हा सुगरण पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. नराने बांधलेल्या घरट्यात मादी अंडी उबवते. एका वेळेस एक नर कमीत कमी चार ते दहा घरटी विणतो. अर्धवट बांधलेल्या घरट्यात मादीने प्रवेश करावा म्हणून नर सुरेल आवाज काढून मादीला आकर्षित करतो. मादी सुगरण घरट्यात येऊन निरीक्षण करते. घरटे आवडले तरच ती नराला दादला म्हणून निवडते. एका वेळी मादी सुगरण दोन ते चार अंडी घालते. नराने अर्धवट बांधलेले घरटे मग दोघे मिळून पूर्ण करतात आणि पिल्ले वाढवितात. मे ते सप्टेंबर विणीचा हंगाम असल्याने सुगरण नराचा रंग पिवळा होतो. एरवी नर व मादी दिसायला सारखेच असतात.
अत्यंत कुशलतेने बांधली जाणारी ही घरटी सध्या भात खाजणात, महामार्गालगत मुबलक प्रमाणात दिसून येत आहेत. मुबलक खाद्य व अनुकूल वातावरणामुळे ठिकठिकाणी सुगरणीचे खोपे दिसू लागल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.
- शेतात, माळरानात सुगरण पक्षी थव्याने राहतो. भातपिकातील किटक व तृण हेच त्याचे अन्न. सुंदर विणकाम करून खोपा तयार झाला की आत जाण्यासाठी खालून निमुळते प्रवेशद्वार केले जाते.
- सुगरण पक्ष्याच्या तीन जाती असून पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण व बाया सुगरण. भारत व शेजारील देशांत हा पक्षी आढळतो. पक्ष्याचा आकार चिमणीसारखा असून मातकट काळा-पिवळा रंग लोभस दिसतो.
-बया, विवर म्हणजेच सुगरण पक्षी ओळखले जातात, त्यांच्या सुबक विणकाम केलेल्या खोप्यांमुळे. पक्ष्यांचा विणीचा हंगाम मुख्यतः पावसाळी असतो. हे पक्षी थव्याने राहत असून संघटित घरटी बांधतात.
- भारताचे पहिले पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांनी रायगड जिल्ह्यातील किहीम येथे सुगरण पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाबद्दल अभ्यास केला होता. केवळ विणीच्या हंगामाकरिता सुगरण पक्षी घरटी बांधतात.
- राम मुंढे, पशू-पक्षी निरीक्षक
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91699 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..