
कोविडनंतर कारागीर मिळणे कठीण - रेश्मा खातू मुलाखत
मुलाखत
यंदाचा गणेशोत्सव भव्यदिव्यच!
---
इंट्रो
मुंबईचा गणेशोत्सव आणि खातू कुटुंबाचे एक वेगळेच नाते आहे. विविध रूपांतील भव्यदिव्य गणेशमूर्ती साकारणारे विजय खातू यांची मुलगी रेश्मा यांनीही एक मूर्तिकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या वडिलांचा वसा त्या पुढे घेऊन जात आहेत. गेली दोन वर्षे कोरोना काळात गणेशोत्सवावर मोठा परिणाम झाला. त्यातून उभारी घेत यंदाचा गणेशोत्सव पुन्हा पूर्वीसारखा भव्यदिव्य होईल, असा विश्वास त्या व्यक्त करतात. उत्सवाचा नवा ट्रेंड, आर्थिक बाजू आणि कामगारांची चिंता अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला...
कोविडनंतर कामगार मिळवण्याचे आव्हान...
कोविड काळात गणेशोत्सवावर एवढे मोठे संकट येईल, असे वाटले नव्हते. गणेशमूर्तींची उंची कमी केली गेली. अखेर सरकारच्या नियमांनुसार सर्वांनाच वागावे लागणार होते. कोविडचा आमच्या क्षेत्रावर खूप मोठा परिणाम झाला. पुढील किमान पाच वर्षे तरी तो जाणवत राहील. कारण, कोविडनंतर आम्हाला लागणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाली. दोन वर्षांत त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधली. वेगळ्या क्षेत्रात ते कार्यरत झाले. उर्वरित कामगारांना सरकारच्या नियमानुसार चार फुटांची मूर्ती साकारावी लागली. शिवाय गणेशोत्सव मंडळांकडेही प्रायोजक नव्हते. देणगीदारही कमी झाले. परिणामी बऱ्याच मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला. मी माझ्या वडिलांच्या नावासाठी ‘खातू ब्रॅण्ड’ चालवते. माझ्याकडे उत्पन्नाची इतर साधने होती; पण जे मूर्तिकार पोटा-पाण्यासाठी मूर्ती व्यवसाय करत होते ते गेल्या दोन वर्षांत निघून गेले. ४० ते ५० टक्के चांगले मूर्तिकारही कमी झाले. कोविडमुळे मूर्तिकारांससोर आव्हान उभे राहिले. आमच्याकडे जवळपास ४० ते ५० कामगार होते. आता त्यांची संख्या अवघ्या दहावर आली आहे. बाकी सर्व लोखंडाच्या व्यवसायात उतरले आहेत. आता ते प्रत्येक गोष्टीत तुलना करायला लागले आहेत. मोबदला, वेळ आणि इतर सुविधा त्यांना सध्या ते ज्या क्षेत्रात आहेत त्यात मिळताहेत. साहजिकच ते इथे यायला तयार होत नाहीत. त्यामुळे यंदाच्या वर्षी कामगार मिळवण्यासाठी कसरत करावी लागली.
वडिलांचा वसा जपण्याचा प्रयत्न
दोन वर्षांनी मूर्ती घडवायला मिळताहेत याचा आनंद आहे. गणेशोत्सव मंडळांमध्येही जल्लोषाचे वातावरण आहे. दर वर्षी मोठ्या प्रमाणात मूर्ती साकारल्या जातात; पण यंदा त्याचे प्रमाण कमी आहे. जागेची समस्या, उशिरा परवानगी आणि कमी कामगारांमुळे यंदा मंडळांना मूर्ती बुक करण्यापूर्वी आगाऊ किंमत द्यावी लागणार आहे. कारण मंडळांवर याचा परिणाम होऊ शकतो. आधी १५० मूर्ती साकारल्या जायच्या. आता फक्त १५ मूर्ती आम्ही तयार करत आहोत. येणाऱ्या इतर ऑर्डर आम्ही नवोदित मूर्तिकारांकडे दिल्या आहेत. चंदनवाडी, ग्रँट रोडचा महागणपती, चिंतामणी आदी मंडळांच्या मूर्ती यापुढे साकारल्या जाणार आहेत. सुबक आणि वेगळी मूर्ती देण्याचा प्रयत्न असेल. वडिलांचा वसा जपण्याचा प्रयत्न आहे. वडिलांचे जुने सहकारी कायम सोबत आहेत. यंदाच्या कुठल्याही प्रकारची बॅक ग्राऊंड नसलेल्या मूर्तीचा नवा ट्रेंड भक्तांना अनुभवायला मिळेल. म्हणजेच मूर्तीच्या मागे कुठल्याही प्रकारची वेगळी सजावट नसेल. ‘चिंतामणीचा राजा’पासून आम्ही याची सुरुवात करत आहोत.
उत्सवात शास्त्र आणणे चुकीचे!
पर्यावरणाचा आणि मूर्तीच्या उंचीचा काही संबंध नाही. मूर्तीच्या उंचीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, असे आतापर्यंत कुठेही ठोसपणे सांगितले गेलेले नाही. मुंबईला १०० वर्षांचा इतिहास आहे. दहा दिवसांच्या उत्सवाचा एवढा बाऊ करू नये. उत्सवात शास्त्र आणणे चुकीचे आहे. आपण गणेशोत्सव एकोप्यासाठी, धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी साजरा करतो. परदेशातूनही अनेक कलाकार मुंबईतील गणेशोत्सव बघायला आणि कौतुक करायला येतात. याच कलाकृती जर परदेशात साकारल्या, तर त्याची प्रचंड किंमत मिळते. पण, आपला उत्सव मुंबईत मोठा व्हायला हवा.
यंदा मॅनहॅटनमध्येच मूर्ती पोहचल्या...
मूर्ती साकारण्याचे आमचे काम कायम सुरू असते. न्यूयॉर्क येथील मॅनहॅटनमधील आर्ट गॅलरीत गेली दीड वर्षे मूर्ती पाठवल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही याआधी मूर्ती गेल्या होत्या. यंदा फक्त मॅनहॅटनमध्ये मूर्ती गेल्या आहेत. मॉरिशिसमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाठवण्यात येतात. तिथेही समुद्रात मूर्तींचे विसर्जन केले जाते. तेथील सरकारने संस्कृतीनुसार चांगली व्यवस्था केली आहे. त्यासाठी त्यांच्या सरकारने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे.
बेशिस्त वागणाऱ्या मंडळांना दंड हवाच
पिढी बदलते तसे उत्सवाचेही स्वरूप बदलणार आहे. शास्त्रात अंगठ्याइतका गणपती सांगितला आहे; पण आपण तेवढ्याच मूर्तीची पूजा करतो का? त्यामुळे सरकारने एक पाऊल पुढे टाकावे. मग मंडळे आणि मूर्तिकारही दोन पावले पुढे टाकतील. बेशिस्त वागणाऱ्या मंडळांना मात्र नियम घालणे गरजेचे आहे. एखादे मंडळ विसर्जनावेळी ट्रॉली सोडून कचरा करून निघून गेले असेल, तर त्यांना दंड लावावा.
(शब्दांकन ः भाग्यश्री भुवड)
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91702 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..