आयर्नमॅन शंकर उथळे पोलीस दलासाठी प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयर्नमॅन शंकर उथळे पोलीस दलासाठी प्रेरणादायी
आयर्नमॅन शंकर उथळे पोलीस दलासाठी प्रेरणादायी

आयर्नमॅन शंकर उथळे पोलीस दलासाठी प्रेरणादायी

sakal_logo
By

पोलिस दलासाठी प्रेरणादायी ‘आयर्नमॅन’ शंकर उथळे

पोलिस दलात कार्यरत असताना बंदोबस्त, न्यायालयातील कामकाज, रोजच्या येणाऱ्या तक्रारी, आरोपींचा शोध यासह अनेक कामांमुळे शारीरिक व मानसिक दमछाक होत असते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. दैनंदिन कामाचा ताण वाढला, वजन वाढले किंवा अन्य कारणाने मानसिकरित्या खचलो तरी त्यावर मात करून इतरांना प्रोत्साहित कसे करता येईल, याचे उदाहरण म्हणजे पोलिस हवालदार शंकर उथळे यांच्याकडे पाहिले जाते.

प्रसाद जोशी, वसई
कर्तव्य बजावत असताना पोलिसांना आपल्या आरोग्य, तंदरुस्तीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, अशी ओरड नेहमीच चालू असते. मात्र याला छेद देत परदेशात भारताचा झेंडा उंचावणारे पोलिस दलातील शंकर उथळे यांची ''आयर्नमॅन'' अशी ओळख निर्माण झाली आहे. ते सध्या मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या वालीव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. अचानक वाढलेल्या वजनानंतर त्यांनी तंदरुस्तीकडे लक्ष देत केलेली जागतिक पातळीवरील कामगिरी पोलिस दलासह सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.

शंकर उथळे यांचे मूळगाव सांगली जिल्ह्यातील येतगाव आहे. २००३ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्यानंतर ठाणे ग्रामीण येथे काम केले व सद्यःस्थितीत वालीव येथे आहेत. काही महिन्यांतच त्यांचे अचानक वजन वाढू लागले आणि ९६ किलोपर्यंत पोहोचले होते. याची चिंता त्यांना सतावू लागले. त्यांची पत्नी अश्‍विनी आणि मुलगी श्रुती यांनी त्यांना प्रेरणा दिल्याने वजन कमी करण्याचा निर्धार केला. याची सुरुवात क्रिकेटपासून केली आणि हळूहळू सायकल चालवणे, पोहणे, धावणे असा नित्यक्रम सुरू झाला. सहा महिन्यांतच त्यांनी ३० किलो वजन कमी केले. यानंतर त्यांनी आयर्नमॅन स्पर्धेची तयारी सुरू केली. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी मलेशियातील स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि १६ तास १५ मिनिटांत त्यांनी स्पर्धा पार केली. त्यानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. बलसाड, गुजरातमधील २०० किमी अंतराची सायकल स्पर्धा त्यांनी अवघ्या ११ तास एक मिनिटात पूर्ण केली. यानंतर बडोदा (गुजरात) येथेही ६०० किमी स्पर्धा ३८ तास ५६ मिनिटांत पूर्ण करत पारितोषिक पटकावले. पुण्यामध्ये ४०० किमी स्पर्धा २५ तासांत पूर्ण केली. २०१९ साली फ्रान्समधील आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी भारताचा झेंडा रोवला. याव्यतिरिक्त त्यांनी ४० मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.

पोलिस दलातील कामकाजातून वेळ मिळाला की, ते हातात पुस्तक घेऊन चाळत असतात. अनेक प्रेरणादायी लेखकांच्या कथा वाचण्यास मग्न होतात. आतापर्यंत अभिनेता मिलिंद सोमण, विरार येथील हार्दिक पाटील, अधिकारी कृष्णप्रकाश यांनी आयर्नमॅन किताब पटकावला आहे. त्यानंतर उथळे यांची देखील नोंद झाली आहे. जिद्द, मेहनत व चिकाटीने आपण जग जिंकू शकतो. केवळ मेहनत करण्याची तयारी हवी, तरच सातासमुद्रापार आपले व देशाचे नाव झळकवू शकतो, हे उथळे यांनी करून दाखवले व अनेक जण धडे गिरवू लागले.

तरुणांनी मैदानी खेळाकडे वळावे
पोलिसांनी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. वेळेवर जेवण्याची सवय ठेवावी. २४ तासांतून किमान एक तास तरी आपल्यासाठी काढून व्यायाम, चालणे, धावणे याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, अन्यथा आरोग्याच्या समस्या भेडसावतात व उतारवयात अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. तरुणांनी फास्टफूड खाणे शक्यतो टाळावे. इंटरनेटच्या गराड्यात अडकून न राहता मैदानी खेळांकडे वळावे, असे आवाहन पोलिस हवालदार शंकर उथळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91705 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..