
औरंगजेब बादशाह चांगला माणूस!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : औरंगजेब बादशहा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. हिंदूंवर हल्ले होत असतील, तर मुस्लिमांवरही हल्ले होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आझमी यांच्या वक्तव्याने वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
कर्जतमध्ये एका तरुणाची अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरणाप्रमाणे हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवू, असेही त्यांनी म्हटले होते. राणेंच्या या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर अबू आझमी आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, की औरंगजेब बादशहाचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. जर त्यांचा खरा इतिहास समोर आला, तर हिंदू नाराज होणार नाहीत. देशभरात अनेकांची नावे औरंगजेब आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लिम व्यक्तीच्या नावावरून आहेत. या जिल्ह्यांची नावे बदलल्याने कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत, महागाई कमी होणार नाही. जर ही नावे बदलून तरुणांना नोकऱ्या मिळणार असतील, तर या बदलाचे स्वागत करेन, असेही ते म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91790 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..