तालुक्याचा भार अवघ्या १२ कर्मचाऱ्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुक्याचा भार अवघ्या १२ कर्मचाऱ्यांवर
तालुक्याचा भार अवघ्या १२ कर्मचाऱ्यांवर

तालुक्याचा भार अवघ्या १२ कर्मचाऱ्यांवर

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : तालुक्याच्या निर्मितीपासून विक्रमगडमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्या आहेत. तालुक्याचा मोठा परिसर ग्रामीण भाग असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. तालुक्यासाठी केवळ १२ कर्मचारी असल्याने त्यांना एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागत असल्याने ग्राहकांना सुविधा मिळण्यास विलंब होत आहे.

विक्रमगड तालुका निर्मितीनंतर २६ जानेवारी २००९ रोजी महावितरण उपविभागीय कार्यालय (उपकार्यकारी अभियंता) सुरू करण्यात आले. २०२० च्या आकडेवारीनुसार विक्रमगड शाखेअंतर्गत १५,२०१ वीज ग्राहक आहेत. १५० रोहित्र असून ३५० किमी लांबीची उच्चदाब वाहिनी व ६१० किमी लघुदाब वाहिनी आहे; तर सेवा देण्याकरिता तीन विभागात अवघे १२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उपविभागीय कार्यालय हे नुसते नावापुरते असल्याचा आरोप वीज ग्राहक करीत आहेत. विक्रमगड शहरातील ओंदे वीजकेंद्रातून साखरा, विक्रमगड व आलोंडा हे ट्रान्स्फॉर्मर असून त्याअंतर्गत गाव खेड्यांपाड्यांना वीज पुरविली जाते. डोंगरदऱ्या व अतिदाट झाडे या कारणामुळे वाहिनी नादुरुस्तीचे प्रमाण जास्त आहे. जंगलपट्ट्याचा भाग असल्याने पावसाळ्यात लाईनमध्ये काही बिघाड झाल्यास वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र महावितरणाच्या विक्रमगड शाखेअतंर्गत असलेल्या वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी केवळ १२ कर्मचारी (वायरमेन) असून त्यातील सहा वायरमेन हे बाह्यस्रोताद्वारे भरती करण्यात आली आहे; तर एक शाखा अभियंता पद रिक्त आहे.

सहायक अभियंता कार्यालयाची मागणी
विक्रमगड तालुक्याचा विस्तार पाहता येथे वीज मंडळाचे आणखी तीन सहायक अभियंता कार्यालयाची गरज आहे. सध्या तालुक्यात एकच कार्यालय असल्यामुळे विविध कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. त्यामुळे अजून तीन विभाग व सहायक अभियंता कार्यालयाची गरज भासत आहे.

शाखा विभाजनाचा प्रस्ताव धूळ खात
विक्रमगड-वाडा रस्त्यालगत नवीन कारखाने सुरू होण्याच्या हालचाली आहेत. तालुक्यातील वाढते नागरीकरण, वाढता औद्योगिक पट्टा या दृष्टीने महावितरणच्या शाखा कार्यालयाचे विभाजन करणे गरजेचे आहे. विक्रमगड महावितरण शाखेकडून शाखा विभाजनाचा प्रस्ताव जानेवारी २०१५ मध्ये कार्यकारी अभियंता, पालघर यांच्याकडे पाठवला होता. मात्र त्यावर कुठलाच निर्णय अद्यापपर्यंत झाला नाही. हा प्रस्ताव धूळ खात आहे.

तालुक्यात वीज ग्राहकांची वाढती संख्या बघता कर्मचाऱ्यांवर भार असल्याने नव्याने तीन विभाग व कार्यालयाची आवश्यकता आहे.
- प्रमोद विश्वनाथ पाटील,
शिवसेना उपतालुकाप्रमुख, विक्रमगड

विक्रमगड कार्यालयाचा शाखेचे विभाजनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. त्या प्रस्तावात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी आहे. त्या प्रस्तावाला मंजूर मिळाली की नवीन शाखा विभाजन होऊन कर्मचारी संख्या वाढेल.
- महेश नागूळ,
उपकार्यकारी अभियंता,
महावितरण, विक्रमगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91805 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..