दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
वडाळा (बातमीदार) ः ‘आम्ही वडाळा पूर्व कर’ परिवारातर्फे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. वडाळा पूर्व येथील मुंबई मनपा शाळा पंचशील बुद्ध विहार येथे झालेल्‍या कार्यक्रमात घराची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात हातभार लावण्यासाठी संस्थेतर्फे समितीचे पदाधिकारी राहुल सातपुते, हरेश शिवलकर, सुशांत दोड मनी, अकबर पटेल, दीपाली उके आणि प्रेसीला कदम या मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत वितरित करण्यात आली.

किरकोळ वादातून तरुणावर हल्ला
मानखुर्द (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजी नगरमध्ये किरकोळ वादातून असिफ खान या तरुणावर हल्ला करण्यात आला. असिफच्या डोक्यात तलवारीने वार करत कुटुंबीयांनादेखील मारहाण करण्यात आली आहे. असिफने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून शिवाजी नगर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दुचाकी उभी केल्यामुळे ये-जा करण्यास त्रास होत असल्याच्या वादातून असिफ याच्यावर बैंगनवाडी परिसरात हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे कुटुंब त्याच परिसरातील रहिवासी असून या हल्ल्यानंतर ते फरार झाले आहेत. असिफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजाने यांनी सांगितले.

मुलुंडमध्ये ‘हम साथ साथ है’ कार्यक्रम
मुलुंड (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ- मुलुंड, महिला विभाग मैत्रेयी यांच्यातर्फे ‘हम साथ साथ है’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यातील भारतीयत्वाला सर्व भारतीयांना जोडण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘हम’ संस्थेच्या कार्याची माहिती आणि यासंदर्भात राजुरी, पूंछ या भागात चालवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची दृक्‍श्राव्य माध्यमातून माहिती प्रज्ञा गोखले यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजता सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम मोफत असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पालिकेच्या सूचनेला हरताळ
धारावी (बातमीदार) : धारावीत अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकला जातो. त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधी पसरते तसेच रोगराई वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने धारावीतील अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, अशा सूचना देणारे फलक लावले आहेत. या फलकांकडे दुर्लक्ष करून स्थानिक रहिवासी फलकासमोरच कचरा टाकून पालिकेच्या आवाहनाला हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.

सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या वतीने वृक्षारोपण
घाटकोपर (बातमीदार) ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत घाटकोपर पश्चिम येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी घाटकोपर येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशेष शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मीनल तारकर (झोन ७) यांच्‍यासह पोलिस अधिकारी तसेच योगेश कदम (माहिती व तंत्रज्ञान) त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत गीत गाऊन लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या संचालिका दीपाली पवार व मुख्याध्यापक जगदीश चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला व सर्व उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91830 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..