बारवी धरणाला हाऊसफुलची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारवी धरणाला हाऊसफुलची प्रतीक्षा
बारवी धरणाला हाऊसफुलची प्रतीक्षा

बारवी धरणाला हाऊसफुलची प्रतीक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ७ : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस जिल्ह्यात पडत असल्याने बारवी धरण जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला १०० टक्के भरेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडीपमुळे बारवी धरणातील पाणीसाठा हा ८६ टक्क्यांवर स्थिरावला आहे. शहरी भागात पावसाची रिमझिम अधेमध्ये सुरू असली तरी धरण परिसरात पाऊस नसल्याने गेल्या नऊ दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात एक टक्क्याचीही वाढ झालेली नाही. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अद्याप १४ टक्क्यांची तूट आहे. ही तूट पूर्ण झाल्‍यास बारवी धरण लवकरच हाऊसफुल होणार आहे.

ठाणे जिल्ह्याची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी बारवी धरण हा एकमेव पर्याय आहे. पाण्याची वाढती मागणी पाहता या धरणाची उंची वाढवण्यात आली. धरणाची उंची वाढवल्याने लघु पाटबंधारे विभागाकडून होणारा पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागत नसला तरी दुरुस्ती कामांच्या आडून होणाऱ्या अघोषित पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहेत. पाण्याची टंचाई व गरज लक्षात घेता जिल्ह्याला पर्यायी धरणाचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र, त्यात अद्याप कोणत्याही हालचाली स्पष्ट नाहीत. पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत बारवी धरणाच्या पाण्यावरच नागरिकांना आपली तहान भागवावी लागणार आहे. जुलै महिन्यातील पावसाचा जोर पाहता जनजीवन विस्कळित होत असले तरी ‘धरण भरू दे एवढा तरी पड बाबा’ असेच शब्द नागरिकांच्या तोंडून निघतात.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला बारवी धरणात ३३ टक्के पाणीसाठा होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने महिना अखेरपर्यंत पाण्याची पातळी ही ८५ टक्क्यांपर्यंत गेल्याने नागरिक सुखावले होते. जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट दूर झाले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरून पुढील वर्षभराची चिंता मिटेल, अशी आशा व्यक्त केली जात होती; परंतु जुलै अखेरीस पावसाचा जोर कमी झाला असून ऑगस्ट महिन्यातही पावसाने उघडीप दिली आहे. शहरी भागात पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी धरण परिसरात पाऊस नसल्याने धरणातील पाण्याची पातळी ही गेल्या नऊ दिवसांपासून ८६ टक्क्यांवर स्थिरावली आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस अपेक्षित
२९ जुलैला धरणात ८५.६३ टक्के पाणीसाठा होता, ३० जुलैला ८६ टक्के पाणीसाठा झाला, २७ जुलैपासून बारवी धरण परिसरात पाऊस पडलेला नाही. यामुळे सात ऑगस्टपर्यंत पाण्याचा साठा हा ८६.७८ टक्क्यांवर आला आहे. धरणात अजूनही १४ टक्के पाण्याची तूट आहे. बारवी धरण परिसरात पाऊस नसला तरी धरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला तरी पाणीपातळीत वाढ होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91836 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..