उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांची दुरवस्था
उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांची दुरवस्था

उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांची दुरवस्था

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांची दुरवस्था झाली असून तुटलेले पत्रे, सिलिंगच्या खाली विद्यार्थी अभ्यास करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक मैनुद्दीन शेख यांनी आयुक्त अजीज शेख, प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

बिर्ला गेट परिसरात तानाजीनगर येथे पालिकेची नरवीर तानाजी मालुसरे ही २३ क्रमांकाची मराठी शाळा व श्रीमती इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय ही २६ क्रमांकाची हिंदी माध्यमाची शाळा आहे. ठेकेदाराने शाळेच्या आवारात लोखंडी सळ्या, जुन्या जाहिरातींच्या लोखंडी चौकटी व अन्य काही भंगार साहित्य ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळेच्या वर्गातील पत्रे, सिलिंग तुटलेले असून त्याखाली बसून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची कसलीही व्यवस्था नसून शेडच्या आजूबाजूला शेवाळ पसरलेले आहे. मराठी शाळेचा दर्जा सुधारावा आणि शाळांच्या देखभालीसाठी दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च केला जातो, पण पालिकेच्या या शाळांची अवस्था बघून निधी नेमका कुठे खर्ची केला गेला, असा सवाल मैनुद्दीन शेख यांनी उपस्थित केला आहे. आपण स्वातंत्र्यदिन आणि केंद्र सरकारचा हर घर तिरंगा हा उपक्रम साजरा करणार असताना या पार्श्वभूमीवर शाळांची अशी दुरवस्था ही शोकांतिका असल्याची खंत मनसे सचिव संजय घुगे यांनी व्यक्त केली आहे. शाळा डिजिटल करण्यात येणार, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल, पालिकेच्या शाळांचे रुपडे बदलून टाकणार हे कागदावरच राहिल्याचा आरोप मनविसेचे उपाध्यक्ष ॲड. कल्पेश माने यांनी केला आहे. या वेळी आयुक्त अजीज शेख यांना मनसेकडून निवेदन देण्यात आले. या वेळी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, मनविसेचे उपाध्यक्ष ॲड. कल्पेश माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेच्या आवारात काही समाजकंटक रात्रीच्या वेळेस वावरत असून शाळेच्या सामानाची नासधूस करतात, तसेच पावसाळ्यामुळे शाळेतील काही वर्गांत पडझड झालेली आहे. आम्ही लवकरच शाळेचा मेकओव्हर करून चांगल्या दर्जाची शाळा बनवण्याचा प्रयत्न करू.
- जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91897 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..