गणेश मूर्तिकारांसमोर अडचणींचा डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मूर्तिकारांसमोर अडचणींचा डोंगर
गणेश मूर्तिकारांसमोर अडचणींचा डोंगर

गणेश मूर्तिकारांसमोर अडचणींचा डोंगर

sakal_logo
By

वाशी, ता. ९ (बातमीदार) ः राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी असलेली चार फुटांची मर्यादा शिथिल केली असल्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना आता अधिक उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार आहे. मात्र, गणरायाच्या आगमनाला अवघा पाऊण महिना उरला असल्याने मोठ्या मूर्ती साकारण्यासाठी गणेश मूर्तिकारांना मात्र विविध अग्निदिव्यांना सामोरे जावे लागत आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यास आता केवळ २० दिवस उरलेले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचे लक्ष आता उत्सवाच्या तयारीकडे लागले आहे. उत्सव साजरा करताना मूर्तीची निवड करण्याची सध्या लगबग सुरू आहे; पण कोरोनाकाळातील दोन वर्षे गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा असल्याने घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फूट; तर सार्वजनिक उत्सव मंडळाची मूर्ती चार फुटांचीच ठेवण्यात आली. त्यामुळे यंदाही अनेक मूर्तिकारांनी लहानच गणेशमूर्ती साकारल्या आहेत. अशातच राज्य सरकारने यंदा उंचीवरील निर्बंधाची अट शिथिल केल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता कारखान्यांमध्ये मोठ्या गणेशमूर्तींची मागणी सुरू केली आहे. मात्र, बहुतांश चित्रशाळांमध्ये मोठ्या मूर्तीच नसल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या गणेशमूर्तींसाठी शहरभर फिरण्याची वेळ आली आहे. सध्या काही तुरळक चित्रशाळांमध्ये मोठ्या मूर्ती साकारण्यात येत आहेत; पण त्यांचीही उंची सहा किंवा सात फुटांच्या वर नसल्याने इतक्या कमी वेळात मोठ्या मूर्ती साकारणे अशक्य असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

चौकट
मोठ्या मूर्तीना परवानगी दिल्यावर सर्व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते दहा फुटांची आणि त्यापेक्षाही मोठी गणेशमूर्तीची मागणी करत आहेत. मात्र एका महिन्यात मोठ्या मूर्ती साकारणे अशक्य आहे. सध्या सहा किंवा सात फुटांच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वेळेअभावी त्याही साकारणे शक्य होणार नाही.
- सुनील मोरे, मूर्तिकार
----------------------------------
दर वर्षी दहा फुटांची किंवा त्याहीपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो; मात्र यंदा मोठी मूर्ती मिळाली नाही. मूर्ती कारखान्यांमध्येही मोठ्या गणेशमूर्ती उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ्या मूर्तींची परवानगी जरी असली, तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही.
- महेंद्र पाटील, बाळ गणेश मित्र मंडळ, कोपरी गाव

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91928 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..