ओमिक्रॉन लाटेच्या पहिल्या चार आठवड्यात गर्भवती महिलांचा रुग्णालयातील प्रवेश वाढला, तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण दोन लाटांच्या तुलनेत फारच कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओमिक्रॉन लाटेच्या पहिल्या चार आठवड्यात गर्भवती महिलांचा रुग्णालयातील प्रवेश वाढला, तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण दोन लाटांच्या तुलनेत फारच कमी
ओमिक्रॉन लाटेच्या पहिल्या चार आठवड्यात गर्भवती महिलांचा रुग्णालयातील प्रवेश वाढला, तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण दोन लाटांच्या तुलनेत फारच कमी

ओमिक्रॉन लाटेच्या पहिल्या चार आठवड्यात गर्भवती महिलांचा रुग्णालयातील प्रवेश वाढला, तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण दोन लाटांच्या तुलनेत फारच कमी

sakal_logo
By

‘ओमिक्रॉन’च्या संकटात गर्भवती महिला प्रकृतीबाबत निश्चिंत
तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण कोविडच्या दोन लाटांच्या तुलनेत फारच कमी

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोविड काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक होता; पण त्याहीपेक्षा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खालावलेली होती, त्यांच्यासाठी तो घातक होता. गर्भवतींच्या आरोग्याची तर कोविड काळात परीक्षाच होती. मात्र, ओमिक्रॉन लाटेचा गर्भवती महिलांवर नेमका काय परिणाम झाला, याविषयी कोणतीही माहिती नव्हती. आयसीएमआर - एनआयआरआरसीएचची प्रेग कोविड नोंदणी टीम आणि बी. वाय. एल. नायर रुग्णालयाने त्याबाबत अभ्यास केला. त्याबाबतच्या विश्लेषणानुसार ओमिक्रॉन लाटेच्या पहिल्या चार आठवड्यांत गर्भवतींचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण दोन लाटांच्या तुलनेत फारच कमी होते. याचा अर्थ डेल्टा-प्री-डेल्टा लाटेत हबकलेल्या गर्भवती सौम्य ओमिक्रॉनमध्ये तुलनेने निश्चिंत होत्या.

नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २०५८ कोविड पॉझिटिव्ह गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिलांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात प्री-डेल्टा, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट अशा तिन्ही लाटांचा समावेश होता. अहवालाचे निरीक्षण इंटरनॅशनल जर्नल ऑफ गायनाकॉलोजी ॲण्ड ऑब्स्टेट्रिक्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि नायर रुग्णालयाचे स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. नीरज महाजन यांनी सांगितले, की ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या चार आठवड्यांच्‍या काळात कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली.

डेल्टापूर्वी आणि डेल्टा लाटेच्या तुलनेत ओमिक्रॉनदरम्यान गर्भवती आणि प्रसूतीपश्चात महिलांमध्ये सार्स कोविड-२ संसर्गाच्या प्रभावावर आम्ही सात प्रमुख फरक नोंदवले. पूर्वीच्या दोन लाटांच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये तरुण स्त्रियांना जास्त त्रास झाला. ओमिक्रॉन लाटेदरम्यान गर्भवती महिलांमध्ये कोविडची लक्षणे असलेल्यांचे प्रमाण जास्त असले, तरी रोगाची तीव्रता आणि मृत्युदर कमी होता. आधीच्या दोन लाटांच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये मुदतपूर्व जन्मदर कमी होता. ओमिक्रॉन लाटेदरम्यान प्रति एक हजार जन्मामध्ये गर्भपाताचे प्रमाण जास्त होते. प्रसूतीदरम्यान मधुमेह मेलिटस कमी होते. उच्च रक्तदाबाचे (एक्लॅम्पसियाचे) प्रमाण जास्त नोंदवले गेले. लक्षणे असणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या चार पट जास्त होती. ०.६ टक्के गर्भवतींमध्ये गंभीर ते अतिगंभीर आजाराची तीव्रता नोंदली गेली जी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, असे सहाय्यक लेखक आणि प्रेग कोविड रजिस्ट्रीचे मुख्य अन्वेषक डॉ. राहुल गजभिये यांनी सांगितले.


मुंबई महानगर प्रदेशात डेल्टापूर्वी आणि डेल्टा लाटेच्या तुलनेत ओमिक्रॉनदरम्यान कोविड आजाराच्या तीव्रतेत घट आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी होते. ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गापर्यंत मर्यादित होता. ओमिक्रॉनच्या अभ्यासासाठी आणखी डेटाची गरज आहे.
- डॉ. गीतांजली सचदेवा, संचालक, आयसीएमआर-एनआयआरआरसीएच

गर्भवती आणि स्तनदा मातांनी कोविडची लस घेऊन स्वतःचे अन् बाळांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. कोविड लसीकरण गंभीर आजार टाळण्यासाठी आणि मृत्यू व गर्भधारणेची गुंतागुंत कमी करण्यासाठी सिद्ध झाले आहे. मात्र, समुपदेशन महत्त्वाचे आहे.
- डॉ. स्मिता महाले, माजी संचालक, आयसीएमआर-एनआयआरआरसीएच

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91973 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..