ठाण्यातील आरक्षित शैक्षणिक भूखंड आठ वर्षे धूळखात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील आरक्षित शैक्षणिक भूखंड आठ वर्षे धूळखात
ठाण्यातील आरक्षित शैक्षणिक भूखंड आठ वर्षे धूळखात

ठाण्यातील आरक्षित शैक्षणिक भूखंड आठ वर्षे धूळखात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ९ : विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी ठाण्यात उपलब्ध करून देण्याच्या पालिकेच्या निर्णयाला खासगी संस्थांच्या गैरकारभारामुळे फटका बसला आहे. ठाणे शहरातील मंजूर विकास योजनेतील भूखंड व सुविधा भूखंड शैक्षणिक धोरणानुसार खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याचा २०१४ मध्ये महासभेत ठराव करण्यात आला होता. मात्र आठ वर्षे होऊनही या ठिकाणी अद्याप शैक्षणिक संस्था सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानासोबत पालिका प्रशासनाच्या कोट्यवधींच्या उत्पन्नावरदेखील पाणी फिरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी या भोंगळ कारभाराला वाचा फोडली असून आरक्षित भूखंडाचे हे ‘श्रीखंड’ लाटण्याचा नेमका कोणाचा डाव आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पुणे पालिकेच्या धर्तीवर शैक्षणिक हब तयार केल्यास ठाणेकर विद्यार्थ्यांसह मुंबई - ठाण्याच्या सीमेवरील मुला-मुलींना लाभ होणार होता. त्यानुसार दहा संस्थांना भूखंड वितरित करण्यात आले आहेत. मात्र आजमितीस आठ वर्षे उलटूनही या ठिकाणी बहुतांश शैक्षणिक संस्थांचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे संबंधित शैक्षणिक संस्थांच्या वाटेत ‘काटे’ पेरण्यात आले असून त्यांचा शैक्षणिक मार्ग अधिकच खडतर झाला आहे. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना निवेदन दिले असून त्यांनी तत्काळ याबाबत मार्ग काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शैक्षणिक संस्थांना मंजुरीनंतर दोन वर्षांतच महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, बंधनकारक होते. दुसरीकडे बांधकाम न करणाऱ्या संस्थांकडून भूखंड परत घेण्याची तजवीजही संबंधित प्रस्तावात करण्यात आली होती; मात्र विद्यार्थीवर्गाचे शैक्षणिक नुकसान करत पालिकेच्या शहर विकास विभागाचे अधिकारी बोटचेपे धोरण राबवत असल्याची टीका मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केली आहे.
...................

चौकट :-
भूखंड, संस्थांचा लेखाजोखा
कावेसर, कौसा, ढोकाळी, माजिवडे, भाईंदरपाडा, कासारवडवली या परिसरात युवक कल्याण समिती, मेस्को, शारदा, एक्सेलसीअर एज्युकेशन सोसायटी तसेच जगदाळे फाऊंडेशन (पूर्वीचे गणेश सेवा ट्रस्ट), सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट, गोपाळराव पाटील या स्थानिक खासगी संस्थांना तसेच आनंदीलाल अँड गणेश पोदार सोसायटी, सेंट झेवियर्स एज्युकेशन ट्रस्ट व यतिमखाना अँड मदरसा अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्ट या अस्थानिक संस्थांना भूखंडांचे वितरण करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91979 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..