डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रीपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रीपद
डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रीपद

डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रीपद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला. भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. चव्हाण यांच्यामुळे डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. आमदार चव्हाण यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पुन्हा शिंदे आणि फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच डोंबिवलीत भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला.

शिंदे व फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता होती. एकनाथ शिंदे यांचे मनपरिवर्तन करण्यात आमदार चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. फडणवीस यांच्या जवळचे आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यास हातभार लावणारे आमदार चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्‍याची चर्चा पहिल्या दिवसापासून सुरू होती. अखेर मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात शिंदे व फडणवीस सरकारला मनसे पक्षाने समर्थन दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपसाठी मोलाचे ठरले होते. त्यांच्या सहकार्यामुळे आमदार पाटील यांनादेखील मंत्रिपद दिले जाणार असल्‍याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच सोमवारी रात्रीपासूनच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर आमदार चव्हाण यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. दरम्‍यान, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी केली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनादेखील या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यास आम्ही दसरा साजरा करू, अशी प्रतिक्रिया या वेळी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माळी यांनी व्यक्त केली.

आमदार चव्हाण यांचा राजकीय प्रवास
२००२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली. २००५ मध्ये डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले. २००७ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदावर विराजमान झाले. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच २००९ मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. २०१४ व त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकणपट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. दरम्यान, २०१६ मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या चार खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यामध्ये बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून ते युतीच्या काळात कार्यरत होते. भाजप-शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आले. आमदार असतानाच त्यांची २०२० मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली. त्‍यानंतर आता २०२२ मध्ये त्यांना पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92121 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..