व्यापारी संकुलाचे प्रवेशद्वार कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी संकुलाचे प्रवेशद्वार कोसळले
व्यापारी संकुलाचे प्रवेशद्वार कोसळले

व्यापारी संकुलाचे प्रवेशद्वार कोसळले

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ९ (बातमीदार) ः मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीमधील व्यापारी संकुलाचे प्रवेशद्वार सोमवारी सायंकाळी कोसळले. या घटनेत दोन दुकानांचे नुकसान झाले; तसेच तीन जण जखमी झाले आहेत. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष प्रदीप (आबा) वाटेगावकर, विभाग संघटक दीनकर शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत जखमींची मदत केली. हे संकुल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली असल्याचे सांगत पालिकेचे सहायक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी हात झटकले. दरम्‍यान, याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल मनसेने केला आहे.
लल्लुभाई वसाहतीमध्ये एमएमआरडीएने व्यापारी संकुल बांधले आहे. त्या संकुलाच्या प्रवेशद्वारावर कमानी उभारल्या आहेत. या कमानींपैकी एक कमान सोमवारी सायंकाळी कोसळली. त्यामुळे कमानीलगत असलेल्या दोन दुकानांचे नुकसान झाले तसेच तिघे जण जखमी झाले. याविषयी माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी याविषयी पालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्याशी संपर्क साधून जाब विचारला. तेव्हा ते संकुल पालिकेच्या अखत्यारीत नसून एमएमआरडीएच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. या घटनेनंतर एमएमआरडीएने याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नसल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे.

प्रवेशद्वार केले बंद
ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी व पालिकेची रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचली होती. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात नेऊन उपचार करण्याऐवजी फक्त फोटो काढून तिथून काढता पाय घेतल्‍याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्‍यान जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा प्रवेशद्वारासमोर जमा करून ते प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे
पालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करण्यास सांगितले. त्‍यावर अधिकाऱ्याने एमएमआरडीएला पत्र पाठवून याविषयी कळवत असल्याचे सांगितले; तर एमएमआरडीएच्या जनसंपर्क विभागाने तत्काळ याची माहिती घेऊन त्याविषयी कळवतो, असे सांगितले आहे.

या व्यापारी संकुलाला एकूण चौदा प्रवेशद्वार आहेत. त्यांची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी. जीर्णावस्थेत असलेले प्रवेशद्वार पाडायला हवीत; तरच या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळेल. तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे.
– आबा वाटेगावकर, उपविभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92124 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..