अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई ः टूरटूर, मोरूची मावशी, भटाला दिली ओसरी, वाऱ्यावरची वरात, कॅरी ऑन पप्पा अशा कित्येक प्रसिद्ध नाटकांबरोबरच तसेच मराठी चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारणारे हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गिरगाव येथील राहत्या घरी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने एक हसरा तारा निखळल्याची भावना सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.
प्रदीप पटवर्धन यांचा जन्म मुंबईत झाला. गिरगावातच ते लहानाचे मोठे झाले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी काम केले. चतुरस्र अभिनेता अशी ओळख असलेल्या प्रदीप पटवर्धन यांनी त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टूरटूर’ या व्यावसायिक नाटकात त्यांनी प्रथम काम केले. हे नाटक १९८३ मध्ये रंगभूमीवर आले. त्यानंतर १९८५ मध्ये आलेल्या सुयोगची निर्मिती असलेल्या ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका साकारली.
‘मोरूची मावशी’ नाटकातील भूमिकेने प्रदीप पटवर्धन यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होती. या नाटकाचे त्यांनी दीड हजारहून अधिक प्रयोग केले. या नाटकाबरोबरच ‘दिली सुपारी बायकोची’, ‘बुवा तेथे बाया’, ‘सखी प्रिय सखी’, ‘बायकोची खंत’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. शिवाय ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘१२३४’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटामधून त्यांना खास प्रसिद्धी मिळाली होती. यामध्ये त्यांनी विनोदी खलनायकाची भूमिका साकारली होती.
प्रदीप पटवर्धन यांच्या पार्थिवावर गिरगाव येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर, विजय कदम, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळी, आनंद म्हसवेकर, प्रमोद पवार आदींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व
अभिनेता प्रदीप पटवर्धन अभिनेते व दिग्दर्शक सतीश पुळेकर यांना गुरुस्थानी मानत असत. बँकेत काम करून त्यांनी आपली अभिनयाची कला जोपासली. रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावर आपल्या विनोदी शैलीचा चांगलाच ठसा उमटवला. अभिनयाबरोबरच नृत्यातही ते चांगलेच पारंगत होते. अभिनय कलेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. २०१९ मध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार मिळाला होता.
----

रंगभूमी, चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनामुळे एक सदाबहार, निखळ, गुणी, उमदा कलावंत मराठी कलासृष्टीने गमावल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या गुणी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे स्मरण होताना प्रत्येक वेळी प्रदीप पटवर्धन यांची आठवण होईल. अनेक चित्रपटसुद्धा त्यांनी गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

माझ्या टूरटूर या नाटकात प्रदीपने पहिल्यांदा काम केले. हे त्याचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यातील त्याचे काम पाहून मग त्याला सुधीर भट यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात घेतले. त्यानंतर मी दिग्दर्शित केलेल्या ‘सखी प्रियसखी’ या नाटकात त्याने काम केले. तसेच माझ्या ‘एक फूल चार हाफ’ या चित्रपटातही त्याने काम केले. तो उत्तम अभिनय करायचाच, पण त्याचबरोबर तो नृत्यदेखील छान करायचा. नाटकाच्या प्रयोगाला वेळेवर यायचा. नृत्य ही त्याची खासियत होती.
- पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शक

प्रदीप पटवर्धन ऊर्फ ‘पट्या’ हा मोरूची मावशी या नाटकाचा सुपरस्टार... सुपर अॅक्टर. आम्ही एकत्र खूप काम केले आहे. आम्हाला बक्षिसेही मिळालेली आहेत. त्याने रंगभूमीवर खूप काम केले आणि तेथेच तो अधिक रमला. ‘बायको असून शेजारी’ हे आमच्या दोघांचे महत्त्वाचे नाटक. त्याचे साडेपाचशेच्या वर प्रयोग झाले. प्रताप गंगावणेने हे नाटक लिहिलेले. त्याच्याबरोबर सिद्धार्थ महाविद्यालयात असताना बऱ्याच एकांकिका आम्ही एकत्र केल्या आहेत आणि पुरस्कारही पटकावले आहेत.
- जयवंत वाडकर, अभिनेते

प्रदीप आणि माझी पहिली भेट सिद्धार्थ महाविद्यालयातील. तो मला सीनियर होता. त्याला पाहून मला अभिनय करण्याची खुमखुमी आली. कारण पहिल्यांदा मला या क्षेत्राबाबत काहीच माहिती नव्हती. ‘परस्पर पावणेबारा’ ही त्याची एकांकिका पाहिली आणि माझ्या मनात अभिनयाची भावना निर्माण झाली. त्यानंतर आम्ही एकत्र खूप काम केले. बँक ऑफ इंडियामध्ये काम करीत असताना मी दिग्दर्शक आणि तो कलाकार, असे आम्ही एकांकिकांमध्ये एकत्र खूप काम केले. लावू का लाथ, चश्मेबहाद्दर हे चित्रपट मी दिग्दर्शित केले. त्यामध्ये त्याने काम केले. दिग्दर्शक आणि अभिनेता अशी आमची जोडी छान जमली होती.
- विजय पाटकर, अभिनेता/ दिग्दर्शक

बँक ऑफ इंडियामध्ये असताना एकांकिकामध्ये प्रदीपबरोबर ओळख झाली. माझ्या ‘हुतूतू’ या चित्रपटात त्याने काम केले. नेहमी हसरा चेहरा आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व असा प्रदीप होता. कलाकार म्हणून त्याने मालिका व चित्रपट केले असले, तरी रंगभूमीवर त्याने अधिक काम केले आहे.
- कांचन अधिकारी, दिग्दर्शिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92164 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..