... तर नॉमिनेशन करता येणार नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

... तर नॉमिनेशन करता येणार नाही!
... तर नॉमिनेशन करता येणार नाही!

... तर नॉमिनेशन करता येणार नाही!

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः नॉमिनेशन प्रक्रियेने घराचे भाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) तसेच घर नावावर झालेली व्यक्ती दुसऱ्याच्या नावे त्या घराचे नॉमिनेशन करू शकत नाही, असा निकाल सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी (एच-पश्चिम) दिला आहे.
सामान्यतः आतापर्यंत असे दुसऱ्यांदा नामनिर्देशन करण्यात कोणतीच अडचण नव्हती. त्यामुळे आता या निकालाचा अर्थ कसा लावायचा, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. अर्थात या प्रकरणात संबंधित व्यक्तीने उच्च न्यायालयातून प्रोबेट घेण्याचा प्रश्नही गुंतलेला आहे; तरीही नामनिर्देशनाद्वारे (नॉमिनेशन) सभासद झाल्यामुळे संबंधितांना पुन्हा नामनिर्देशन (नॉमिनेशन) करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख उपनिबंधक बजरंग जाधव यांच्या आदेशात आहे. त्यामुळे येथे प्रोबेटचा प्रश्न गुंतलेला नसता तरीदेखील या दुसऱ्या नामनिर्देशनावर बंदी आली असती का, अशीही चर्चा आता सहकार वर्तुळात सुरू झाली आहे.
वांद्रे (प.) येथील सारा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ज्योत्स्ना मेंडा व प्रेम मेंडा यांच्या अर्जावर नुकताच हा आदेश झाला आहे. या दोघांना २०१५ मध्ये उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानुसार संस्थेने भागदाखला दिला होता. या घर क्र. ७१ चे मूळ मालक श्रीमती गीता लालवानी यांनी त्या दोघांच्या नावे नॉमिनेशन केले होते. गीता लालवानी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठीचे प्रोबेट मिळवण्यासाठी मेंडा दाम्पत्याने उच्च न्यायालयात केलेला अर्ज प्रलंबित आहे.
अशा स्थितीत मेंडा दाम्पत्याने आपल्या मुलांच्या नावे हे घर नामनिर्देशित करण्यासाठी केलेला अर्ज संस्थेने सन २०२० मध्ये फेटाळला. त्यामुळे या दाम्पत्याने अनुपमा गावडे व श्रद्धा कुलकर्णी यांच्यामार्फत उपनिबंधकांकडे अर्ज केला. मेंडा यांच्या प्रोबेट अर्जाला या प्रकरणात हितसंबंध असलेल्या काही व्यक्तींनी विरोध केला. त्यामुळे भविष्यात वारसाबाबत वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. हे घर गीता लालवानी फाऊंडेशनच्या नावे असल्याने श्रीमती लालवानी याच घराच्या एकमेव मालक असल्याचे स्पष्ट होत नाही. मेंडा दाम्पत्याला नामनिर्देशनाद्वारे घर मिळाले असल्याने ते नॉमिनल सभासद असल्याने त्यांच्या अर्जानुसार दुसऱ्यांना नॉमिनेशन करता येणार नाही, असे म्हणणे संस्थेने मांडले.
...
संस्थेचा निर्णय योग्य!
सहकार उपविधीनुसार मृत व्यक्तीचा भागदाखला व घर नामनिर्देशनानुसार हस्तांतरित करण्याची तरतूद आहे; मात्र नामनिर्देशनानुसार सभासदत्व दिलेल्या व्यक्तीला मालकी हक्क मिळत नाही, तो कोणत्याही प्रकारे त्रयस्थ हितसंबंध निर्माण करू शकत नाही वा हस्तांतरण करू शकत नाही, असे उपनिबंधकांनी आदेशात म्हटले आहे. अर्जदार मेंडा दाम्पत्य हे नामनिर्देशनाद्वारे सभासद झाल्याने ते नामनिर्देशन करू शकत नाहीत. तसेच त्यांच्या प्रोबेटचा वाद प्रलंबित असल्याने संस्थेचा निर्णय योग्य आहे, असा निकालही त्यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92189 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..