शिक्षकांचे वेतनासाठी ठाण्याला हेलपाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांचे वेतनासाठी ठाण्याला हेलपाटे
शिक्षकांचे वेतनासाठी ठाण्याला हेलपाटे

शिक्षकांचे वेतनासाठी ठाण्याला हेलपाटे

sakal_logo
By

पालघर, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन आठ वर्षे झाली. जिल्हास्तराची अनेक कार्यालये सुरूही झाली; मात्र माध्यमिक शाळा विभागाचे वेतन अधीक्षक कार्यालय अजूनही ठाणे येथे असल्याने वेतन बिले देण्यासाठी अजूनही ठाणे येथेच हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेतन अधीक्षक कार्यालय स्थापन करण्याची मागणी शिक्षकांतून होत आहे.
पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी वेतन अधीक्षक कार्यालय नसल्याने पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यातील माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन बिले देण्यासाठी दरमहा ठाणे येथे हेलपाटे मारावे लागत आहेत.
त्यामुळे जिल्हा माध्यमिक संघटनेने वेतन अधीक्षक कार्यालय पालघरमध्ये स्थलांतरित करावे, यासाठी बेमुदत उपोषणही केले होते. त्या वेळी खासदार राजेंद्र गावित यांनी मध्यस्थी करून एक महिन्यात वेतन अधीक्षक कार्यालय पालघर येथे स्थलांतरित होईल, असे आश्वासन दिले होते. याला एक वर्ष झाले, तरी अजूनही वेतन अधीक्षक कार्यालय पालघर येथे स्थलांतरित झालेले नाही.
शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित
पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश प्रधान, कार्याध्यक्ष रवींद्र ठाकूर, समन्वय समिती अध्यक्ष मायकल घोन्सालविस, कार्यवाह नामदेव पाटील, यांनी नुकतीच ठाणे वेतन अधीक्षक संतोष कांबळे यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांतील अनेक महिन्यापासून प्रलंबित शिक्षकांची पुरवणी बिले, सेवानिवृत्त महागाई भत्ता बिले, पदोन्नतीतील फरकाची बिले, सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता यांची फरक बिले अशी ३२ प्रकरणे चर्चेला घेऊन तातडीने मंजूर करावी, अशी आग्रही भूमिका घेतली. यावर वेतन अधीक्षकांनी सकारात्मक भूमिका घेतली व कार्यवाहीचे आदेश दिले.
पुन्हा आंदोलनाची हाक
ठाणे येथील पालघर जिल्ह्याचे वेतन कार्यालय पालघर येथे स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली. मात्र हा विषय शासन स्तरावरील असल्याने शासन स्तरावर याचा पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करणार आहोत, असे गणेश प्रधान यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92222 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..