नाटकांमधून राष्ट्रीयतेची भावना जागविण्याचे कार्य व्हावे - राज्यपाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटकांमधून राष्ट्रीयतेची भावना जागविण्याचे कार्य व्हावे - राज्यपाल
नाटकांमधून राष्ट्रीयतेची भावना जागविण्याचे कार्य व्हावे - राज्यपाल

नाटकांमधून राष्ट्रीयतेची भावना जागविण्याचे कार्य व्हावे - राज्यपाल

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. १० (बातमीदार) : साहित्य, संगीत, नाट्य व कला हे उथळ मनोरंजनाकरिता नसतात, तर ते अभिरुचीपूर्ण आनंदाकरिता असतात. नाटकांच्या माध्यमातून मनोरंजन निश्चितच व्हावे; परंतु त्यासोबतच राष्ट्रीयतेची भावना व शाश्वत मानवी मूल्ये जागविण्याचे कार्यदेखील व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) या संस्थेने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ९ ते १३ ऑगस्‍ट यादरम्‍यान भारत नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक आणि ज्येष्ठ रंगकर्मी वाणी त्रिपाठी टिक्कू यांची या समारंभाला विशेष उपस्थिती होती. राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) चे संचालक, प्राध्यापक रमेश चंद्र गौड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
हा महोत्सव जनतेसाठी खुला आहे. उद्घाटनानंतर लगेचच चंद्रकांत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित ‘आय एम सुभाष’ या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला. बुधवारी (ता. १०) डॉ. मंगेश बनसोड यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘गांधी-आंबेडकर’ या हिंदी नाटकाचा प्रयोग पार पडला.

एनएसडीने देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्यांची ओळख नाटकांतून करून दिली, हे कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. तरुणांना उत्सवाबद्दल आणि नाटकांमध्ये चित्रित केल्या जाणाऱ्या कथांबद्दल जागरूक करा.
– वाणी त्रिपाठी, अभिनेत्री

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा हा स्तुत्य उपक्रम आहे आणि तो तरुण पिढीसाठी प्रेरणादायक आहे.
– रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शूर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत कारगिल एक शौर्यकथा नावाचे नाटक रंगवले आहे.
– प्राध्यापक रमेशचंद्र गौड, संचालक, एनएसडी

कोणत्‍या दिवशी कोणते नाटक (वेळ सायंकाळी सात वाजता)
११ ऑगस्टला रूपेश पवार यांचे हिंदी नाटक ‘ऑगस्ट क्रांती’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.
१२ ऑगस्टला सुनील जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टिळक आणि आगरकर’ या मराठी नाटकाचा प्रयोग होणार आहे. मुंबईच्या अभिजात नाट्य संस्था आणि श्री आर्यादुर्गा क्रिएशन्स यांचे हे सादरीकरण आहे.
१३ ऑगस्टला मोहम्मद नजीर कुरेशी दिग्दर्शित ‘रंग दे बसंती चोला’ नाटकाने महोत्‍सवाची सांगता होईल. भोपाळच्या कारवान थिएटर ग्रुपचे हे नाटक आहे.

भारत रंग महोत्‍सवाबद्दल
या भारत रंग महोत्सवाचा (आझादी सेगमेंट) चा भाग म्हणून १६ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत दिल्ली, भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, बेंगळुरू आणि मुंबई येथे ३० नाटके सादर केली जात आहेत. भारत रंग महोत्सव किंवा नॅशनल थिएटर फेस्टिव्हल हा १९९९ मध्ये सुरू झाला. हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्लीने आयोजित केलेला वार्षिक थिएटर फेस्टिव्हल आहे. सर्जनशील नाट्य कलाकारांच्या कार्याचे प्रदर्शन करणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवाची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय झाली आहे. हा आशियातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92268 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..